पाणीपट्टी वसुली कंत्राटात युती?
By Admin | Updated: December 25, 2014 00:47 IST2014-12-25T00:44:31+5:302014-12-25T00:47:48+5:30
विकास राऊत, औरंगाबाद समांतर जलवाहिनीची कंत्राटदार कंपनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीने ३१ मार्च २०१५ पर्यंत पाणीपट्टी वसुलीतून ४४ कोटी रुपयांचे उत्पन्न कमविण्याचे लक्ष्य ठेवले

पाणीपट्टी वसुली कंत्राटात युती?
विकास राऊत, औरंगाबाद
समांतर जलवाहिनीची कंत्राटदार कंपनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीने ३१ मार्च २०१५ पर्यंत पाणीपट्टी वसुलीतून ४४ कोटी रुपयांचे उत्पन्न कमविण्याचे लक्ष्य ठेवले असून, वसुलीचे कंत्राट शिवसेना, भाजपाशी जवळीक असलेल्या काही जणांना देण्यात आल्याचे कळते. अनधिकृत नळांकडून वसुली करण्यातून कंपनी वसुली करणाऱ्यांना २ ते ७ कोटी रुपयांच्या दरम्यान रक्कम देणार आहे. ही रक्कम नागरिकांच्या खिशातून जाणार आहे.
भाजपा सभागृहात समांतरच्या विरोधात भूमिका घेत आहे. तर शिवसेनेतील एक गट ३ वर्षांनंतर पाणीपट्टी वसुली कंपनीने करण्याची मागणी करीत आहे. असे सगळे चित्र असताना पाणीपट्टी वसुलीचे कंत्राट या दोन्ही पक्षांच्या हितचिंतकांकडे दिले आहे. शहरातील १ लाख ६ हजार घरगुती नळधारकांना सरसकट ४ हजार १५० रुपयांची नोटीस कंपनीने नेमलेले गुंड बजावत फिरत आहेत. याप्रकरणी कंपनी कुठलीही माहिती देण्यास तयार नाही.
७९२ कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनी योजनेच्या करारानुसार प्रत्येकी ३०५० रुपये पाणीपट्टीतून १८०० रुपये मनपाच्या एएसओजी खात्यावर कंपनीला जमा करावे लागतील. १ लाख ६ हजार नळधारकांकडून अंदाजे ३२ कोटी रुपयांची पाणीपट्टी ३१ मार्चपर्यंत संकलित होईल.