कॉँग्रेस-राष्ट्रवादीत केजला हातमिळवणी
By Admin | Updated: May 3, 2015 00:59 IST2015-05-03T00:44:51+5:302015-05-03T00:59:43+5:30
केज : नगराध्यक्षपदी कोण? हे साडेतीन महिन्यांपासूनचे कोडे अखेर शनिवारी सुटले. सत्तेच्या काठावर असलेल्या काँग्रेसने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्तेची गुढी मोठ्या थाटात उभी केली.

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत केजला हातमिळवणी
केज : नगराध्यक्षपदी कोण? हे साडेतीन महिन्यांपासूनचे कोडे अखेर शनिवारी सुटले. सत्तेच्या काठावर असलेल्या काँग्रेसने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्तेची गुढी मोठ्या थाटात उभी केली. राष्ट्रवादीच्या टेकूवर काँग्रेसच्या हाती सत्तेचा रिमोट आला असला तरी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही महत्त्वाची पदे काँग्रेसने स्वत:कडेच ठेवली. नगराध्यक्षपदी कबीरोद्दीन इनामदार तर उपनगराध्यक्षपदी आदित्य पाटील यांची वर्णी लागली.
१७ सदस्यांच्या नगरपंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक ८, भाजपने ५, राष्ट्रवादीने २ जागा मिळविल्या होत्या. दोन अपक्षांनीही नगर पंचायतीत मुसंडी मारली होती. शनिवारी नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे कबीरोद्दीन इनामदार तर भाजपकडून हारूण इनामदार आमनेसामने आले. हात उंच करून मतदान घेण्यात आले. राष्ट्रवादीच्या दोन्ही नगरसेवकांनी काँग्रेसच्या बाजूने ‘हात’ उंच केला. त्यामुळे कबीरोद्दीन यांना १० मते मिळाली. हारूण यांना भाजपचे ५ व १ अपक्ष अशी सहा मते मिळाली. अपक्ष नगरसेवक मुज्जफीर तांबोळी यांच्या पदाला आक्षेप असल्यामुळे त्यांचे मत बंद पाकिटात सील करण्यात आले. न्यायालयीन निर्णयानंतर या मताचा विचार केला जाणार आहे.
निवडीनंतर उघड्या जीपमधून कबीरोबद्दीन इनामदार व आदित्य पाटील यांची मिरवणूक निघाली.
ग्रा. पं. सदस्य ते नगराध्यक्ष
नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव होते. काँग्रेसकडून चौघांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे चुरस वाढली होती. मात्र, कबीरोद्दीन इनामदार यांच्यावर काँग्रेसने विश्वास दाखविला. ३४ वर्षीय कबीरोद्दीन हे यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य होते. ते बारावी उत्तीर्ण असून पाटील कुटुंबियांचे निकटवर्तीय आहेत. ग्रा.पं. सदस्य ते नगराध्यक्ष अशी भरारी त्यांनी घेतली.
विकास हाच ध्यास
विकास हाच ध्यास असून विश्वास सार्थ ठरवू, असे खा. रजनी पाटील म्हणाल्या. (वार्ताहर)