युतीची शक्यता होतेय धूसर

By Admin | Updated: November 2, 2016 00:56 IST2016-11-02T00:52:35+5:302016-11-02T00:56:18+5:30

उस्मानाबाद : शिवसेना-भाजपाने राज्य पातळीवर युतीची घोषणा केली असली तरी जिल्ह्यात युती होण्याची शक्यता धूसर होत आहे.

Coalition likely to be gray | युतीची शक्यता होतेय धूसर

युतीची शक्यता होतेय धूसर

उस्मानाबाद : शिवसेना-भाजपाने राज्य पातळीवर युतीची घोषणा केली असली तरी जिल्ह्यात युती होण्याची शक्यता धूसर होत आहे. भाजपाला महत्वाच्या ठिकाणचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोडण्यास शिवसेना तयार नाही. त्यामुळे बोलणी रेंगाळली आहे. दरम्यान, दुसरीकडे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासाठीची तयारी सुरुच ठेवली आहे.
उस्मानाबादसह जिल्ह्यातील ८ नगरपालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर सर्वच प्रमुख पक्षांनी अंतर्गत साटे-लोटे करीत आपल्या पक्षाकडून सक्षम उमेदवार कशा पद्धतीने देता येईल यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. शिवसेना-भाजपाची जिल्ह्यात युती होते का? याकडेही अनेकांच्या नजरा आहेत. भाजपाने कळंब नगराध्यक्षपदाचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती. याबरोबरच परंडा आणि इतर काही नगराध्यक्षपदासाठीही भाजपाचा आग्रह कायम आहे. मात्र उस्मानाबाद, कळंब, परंडा आणि उमरगा या प्रमुख चारही ठिकाणच्या नगराध्यक्षपदाची जागा भाजपाला सोडण्यास शिवसेना तयार नसल्याने युतीचे घोडे आडले आहे.
मंगळवारी भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी निभावण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची उस्मानाबादेत आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. निवडणूक कालावधीत पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहंचण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करावेत, याबाबतचे मार्गदर्शन या बैठकीत करण्यात आले. विशेष म्हणजे या बैठकीला शहरातून मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, त्यानंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होणार आहे.
उस्मानाबाद नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी ३१ जणांनी ५८ अर्ज दाखल केले आहेत. तर नगरसेवक पदासाठी ४०२ जणांनी ५४४ अर्ज भरले आहेत. छाननीनंतर यातील किती उमेदवार शिल्लक राहतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Coalition likely to be gray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.