शेतकऱ्यांचा तलाठ्यास घेराव
By Admin | Updated: June 27, 2014 00:16 IST2014-06-26T23:51:06+5:302014-06-27T00:16:40+5:30
हिंगोली : गारपिटीत नुकसान होवूनही अनुदानाच्या यादीत नावे नसल्याने संतप्त झालेल्या भिरडा येथील ५० उत्पादकांनी गुरूवारी तलाठी धाबे यांना घेराव घातला.

शेतकऱ्यांचा तलाठ्यास घेराव
हिंगोली : गारपिटीत नुकसान होवूनही अनुदानाच्या यादीत नावे नसल्याने संतप्त झालेल्या भिरडा येथील ५० उत्पादकांनी गुरूवारी तलाठी धाबे यांना घेराव घातला. त्यावेळी नव्याने नावे समाविष्ट करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हा घेराव मागे घेतला. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत वंचित उत्पादकांची यादी बनविण्याचे काम सुरू होते.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत भिरडा येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी झालेल्या सर्व्हेक्षणातील अनुदानाची गुरूवारी यादी पाहिल्यानंतर वंचित उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. प्रचंड नुकसान होवूनही अनुदानाच्या यादीत नावे नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सकाळी ८ वाजता हिंगोली तहसील कार्यालय गाठले. शेतकऱ्यांनी तलाठ्यास बोलावून विचारपूस केल्यानंतर धाबे कार्यायातून निघून गेले. दरम्यान तलाठी धाबे दिवसभर तहसीलला परतले नाहीत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतर काही उत्पादकांनी घरी जावून धाबे यांना बोलावून घेतले. तलाठी कार्यालयात येताच जवळपास ५० उत्पादकांनी धाबे यांना घेराव घातला.
नावे समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी शेतकरी प्रल्हाद थोरात, पांडुरंग थोरात, प्रकाश पठाडे, सोनाजी गायकवाड, शिवाजी थोरात, माणिक शिंदे, मनोहर पठाडे, राजू पठाडे, रामजी पठाडे यांच्यासह अनेक शेतकरी आक्रमक झाले. ही माहिती मिळताच जि. प. चे उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, हिंगोली पं. स. चे उपसभापती विनोद नाईक हे तहसील कार्यालयात दाखल झाले. त्यांच्यासमवेत तलाठी धाबे यांनी नव्याने यादी तयार करून वंचितांची नावे समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)