अमेरिकेतील दत्ताशी साधला मुख्यमंत्र्यांनी संवाद...!
By Admin | Updated: May 26, 2017 00:31 IST2017-05-26T00:28:26+5:302017-05-26T00:31:44+5:30
औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील हलगरा येथील दत्ता पाटील हा सध्या अमेरिकेतील याहू डॉट कॉम कंपनीत मोठ्या हुद्यावर कार्यरत आहे.

अमेरिकेतील दत्ताशी साधला मुख्यमंत्र्यांनी संवाद...!
बालाजी थेटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील हलगरा येथील दत्ता पाटील हा सध्या अमेरिकेतील याहू डॉट कॉम कंपनीत मोठ्या हुद्यावर कार्यरत आहे. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्राची गावच्या विकासाबाबतची धडपड पाहून मुख्यमंत्रीही चकित झाले. त्यांनी थेट हलगरा येथील शिवारातून अमेरिकेतील दत्ता पाटलांशी व्हिडिओ कान्फरन्सव्दारे संवाद साधत कौतुक केले. आज दत्ता पाटीलचा आदर्श सर्वच तरुणांनी घेतला पाहिजे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हलगरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झालेला दत्ता पाटील उच्च शिक्षणाच्या बळावर अमेरिकेतील याहू डॉट कॉम या कंपनीत व्यवस्थापनात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अमेरिकेत असतानाही त्यांची आपल्या गावच्या मातीशी जुळलेली नाळ कायम आहे. अमेरिकेतून दत्ता पाटीलने जलयुक्त कामासाठी गतवर्षी १० लाख रुपयांची तर यंदा १५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. गावकऱ्यांच्या कामावर समाधान व्यक्त करीत दत्ता पाटीलने या कामाला पाठबळ दिले आहे. त्याच दत्ताचे मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांसमोर गुरुवारी सकाळी कौतुक केले.