सहा वॉर्डांमधील पाणीपुरवठा बंद

By Admin | Updated: June 11, 2014 00:53 IST2014-06-11T00:51:21+5:302014-06-11T00:53:35+5:30

औरंगाबाद : सिडको- हडकोतील वसाहतींचा कोलमडलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाच्या उपअभियंत्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता सहा वॉर्डांचा पाणीपुरवठा बंद केला.

Closed water supply in six wards | सहा वॉर्डांमधील पाणीपुरवठा बंद

सहा वॉर्डांमधील पाणीपुरवठा बंद

औरंगाबाद : सिडको- हडकोतील वसाहतींचा कोलमडलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाच्या उपअभियंत्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता सहा वॉर्डांचा पाणीपुरवठा बंद केला. सिडको- हडकोसाठी टाकण्यात आलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीवर ६ ठिकाणी बायपास असून, तेथून ६ वॉर्डांना पाणीपुरवठा होतो. मागील दीड महिन्यापासून सातत्याने सिडको- हडकोतील २२ वॉर्डांचा पाणीपुरवठा कोलमडतो आहे. त्याचे नियोजन करण्याऐवजी एक्स्प्रेस जलवाहिनीवरील वसाहतींचा पाणीपुरवठा बंद करून पालिकेने सिडको- हडकोचे नियोजन केल्याने अंदाजे ७० हजार नागरिकांना आज पाणीपुरवठा झाला नाही.
वीजपुरवठ्यामुळे शहरात अडचण
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा कोलमडल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागाचे मत आहे. क्रांतीचौक, एन-५ जलकुंभावरील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अनेक भागांना पाणीपुरवठा झाला नाही.
यांत्रिकी विभागाचे मत
यांत्रिकी विभागाचे उपअभियंता यू.जी. शिरसाठ म्हणाले की, आज महावितरणकडून काहीही अडचण आली नाही. काल ९ जून रोजी झालेल्या पावसातही वीजपुरवठा सुरळीत होता. शहराला दोन्ही जलवाहिन्यांकडून सुरळीत पाणीपुरवठा झाला.
या वसाहतींना निर्जळी
सूतगिरणी, शिवाजीनगर, आर.बी. हिल्स, गारखेडा, विजयनगर, गजानन कॉलनी, पुंडलिकनगर, न्यू हनुमाननगर, जयभवानीनगर, जिजामाता कॉलनी, एन-३, एन-४, एन-२ ठाकरेनगर, विद्यानगर या भागांमध्ये आज पाणीपुरवठा झाला नाही. काही ठिकाणी पाणीपुरवठा झाला मात्र कमी दाबाने.
वितरण विभागाचे मत
कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, सिडको-हडकोसाठी सहा वॉर्डांतील वसाहतींचा पाणीपुरवठा बंद केल्याचे मला माहिती नाही. त्या प्रभागांची जबाबदारी उपअभियंत्यांवर आहे. त्यांनाच पाण्याबाबत विचारावे लागेल.
४उपअभियंता आय.बी. खाजा, पदमे यांच्याकडे त्या जलवाहिनीवरील वसाहतींना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सक्तीचा गॅप; बायपास बंद
सूतगिरणी, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल जलकुंभ, मरीमाता, शिवाजीनगर या ठिकाणांहून १,२०० मि.मी. व्यासाच्या एक्स्प्रेस जलवाहिनीतील पाणी सहा वॉर्डांना बायपासने पुरविले जाते. त्या वसाहतींना आज सक्तीचा गॅप देण्यात आला. सिडको- हडकोला ४० एमएलडी पाण्याची गरज आहे. त्या जलवाहिनीतून ३३ एमएलडीच पाणीपुरवठा होतो. ७ एमएलडी पाण्याची गळती होते, तर सहा वॉर्डांना ६ एमएलडी पाणीपुरवठा होतो. २७ एमएलडी पाण्यात सिडको-हडकोची तहान भागत नाही.

Web Title: Closed water supply in six wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.