बंद योजनांनी टाकली टंचाईत भर

By Admin | Updated: August 26, 2014 01:51 IST2014-08-26T00:46:52+5:302014-08-26T01:51:31+5:30

परभणी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत अजूनही २७० नळ योजना अपूर्ण आहेत़ सध्या टंचाईची स्थिती निर्माण झाली असून

Closed plans filled with scarcity | बंद योजनांनी टाकली टंचाईत भर

बंद योजनांनी टाकली टंचाईत भर


परभणी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत अजूनही २७० नळ योजना अपूर्ण आहेत़ सध्या टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, या योजना वेळेत कार्यान्वित झाल्या असत्या तर समस्या थोड्याफार प्रमाणात कमी झाली असती़
दुुष्काळी स्थितीने जिल्हा ग्रासला असताना दुसरीकडे नियोजनाच्या अभावामुळे देखील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटावा, ग्रामस्थांची पाण्याची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने ग्रामीण पाणीपुरवठा योजना काम करते़ भारत निर्माण आणि राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना उभारल्या जातात़ या योजना उभारल्यानंतर त्या ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केल्या जातात़ जिल्ह्यात भारत निर्माण आणि राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ४०२ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या होत्या़ त्यापैकी केवळ १३२ योजना आतापर्यंत पूर्ण झाल्या असून, २७० योजना अपूर्ण आहेत़
ग्रामीण भागात अनेक गावे अशी आहेत की ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे़ परंतु, नियोजनाचा अभाव असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईसारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे़ सध्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ जलस्त्रोत आटू लागले आहेत़ प्रमुख बंधारे, तलाव, विहिरी आणि हातपंपांचे पाणी तळ गाठू लागले आहे़ त्यामुळे पाणीटंचार्इंचा प्रश्न उग्र बनत चालला आहे़ ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी योजना राबविण्यात आल्या़ परभणी तालुक्यात ७१ योजनांना मंजुरी मिळाली़ त्यापैकी केवळ २८ योजना पूर्ण झाल्या आहेत़ पूर्णा तालुक्यात ४८ योजनांपैकी १५, गंगाखेड तालुक्यात ५५ पैकी २०, जिंतूर तालुक्यात ५३ पैकी ६, पाथरी तालुक्यात २४ पैकी १४, सेलू तालुक्यात ४४ पैकी २४, पालम तालुक्यात ६२ पैकी ९, मानवत तालुक्यात २२ पैकी ९ आणि सोनपेठ तालुक्यात २३ पैकी केवळ ७ योजना पूर्णत्वाला गेल्या आहेत़
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचे उद्दिष्टय पूर्ण करण्यामध्ये सेलू तालुका आघाडीवर असल्याचे दिसते़ या तालुक्यासाठी ४४ योजना मंजूर झाल्या होत्या़
यापैकी २४ योजना पूर्ण झाल्या आहेत़ तर पालम, जिंतूर या तालुक्यांमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात मोठी अनास्था असल्याचे दिसते़ पालम तालुक्यात ६२ पैकी ९ तर जिंतूर तालुक्यात ५३ पैकी केवळ ६ योजना पूर्णत्वाला गेल्या आहेत़ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती स्पष्ट होते़ (प्रतिनिधी)

जिल्ह्यामध्ये ४०२ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली होती़ त्यापैकी केवळ १३२ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत़ परंतु, अनेक योजनांची कामे अजूनही पूर्णत्वास गेलेली नाहीत़ परभणी तालुक्यामध्ये ४३ योजनांची कामे होणे बाकी आहेत़ पूर्ण तालुक्यात ३३, गंगाखेड तालुक्यात ३५, जिंतूर तालुक्यात ४७, पाथरी १०, सेलू २०, पालम ५३, मानवत १३ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये १६ पाणीपुरवठा योजनांची कामे अजूनही अपूर्ण आहेत़ ही कामे वेळेत पूर्ण झाली असती तर पाणी प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच मदत झाली असती़

Web Title: Closed plans filled with scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.