ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: January 16, 2016 23:54 IST2016-01-16T23:54:03+5:302016-01-16T23:54:25+5:30
हदगाव : मीटर नाही तरीही वीजबिल चालू असा प्रकार हदगाव तालुक्यात जोरात सुरू आहे. तालुक्यातील हजारो ग्राहकांनी अनामत रक्कम भरुनही मागील दोन-दोन वर्षांपासून त्यांना वीज मीटर मिळाले नाही

ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत
हदगाव : मीटर नाही तरीही वीजबिल चालू असा प्रकार हदगाव तालुक्यात जोरात सुरू आहे. तालुक्यातील हजारो ग्राहकांनी अनामत रक्कम भरुनही मागील दोन-दोन वर्षांपासून त्यांना वीज मीटर मिळाले नाही. एकूणच या सर्व प्रकारामुळे ग्राहकांची धावपळ सुरू आहे.
मनाठा येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र असून ४० गावांचा कारभार याअंतर्गत चालतो. त्यासाठी एक कनिष्ठ अभियंता, एक लाईनमन व सहा सहाय्यक लाईनमन आहेत. गावची लोकसंख्या सात हजारांच्या आसपास आहे. काहींना घरकुले मिळाली तर काहींनी प्लॉट घेवून घरे बांधली. नवीन घरमालक व विभक्त कुटुंबांना विद्युत मीटरची आवश्यकता असल्याने अनेकांनी नवीन जोडणीसाठी अर्ज दाखल केले. पूर्वी एकाच मीटरवरुन अनेकांना वीज जोडणी दिली जात होती. हा प्रकार महावितरणने बंद केला. आता एका कुटुंबाला एक विद्युत मीटर अनिवार्य केल्याने अनेकांना मीटर घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे ग्राहक वाढले. अनेकांनी वीज मीटरसाठी कोटेशन भरले. मात्र मीटर मिळाले नाही. अनेक ग्राहकांना मीटर नसतानाही सरासरी बिले मात्र सुरू झाले आहेत. कित्येकांनी बिलेही भरली. मात्र भोकरच्या भरारीच्या पथकाने कारवाई केल्याचे कळताच अनेकांमध्ये घबराहट पसरली. अशी जवळपास १४० ग्राहक एकट्या मनाठा गावात निघाली आहेत. प्रत्येक गावात ही संख्या आहे.
वीजचोरीवर आळा घालण्यासाठी नियमित ग्राहकांना अवरेज बिल द्यायचे व दुसरीकडे चोरी करण्यासाठी ग्राहकांना उत्तेजन द्यायचे असा वीज मंडळाचा कारभार सुरू आहे. वीज मीटर नसतानाही वीज बिले दिली जातात. मग दीड हजार रुपये वीज मीटरसाठी भरायचे कशासाठी? असा सवाल आहे. एका ग्राहकाकडून जवळपास ३५०० रुपये घेतली जातात. वीज मीटरचे कंत्राट एका कंपनीकडे आहे.
मागणी केल्यानुसार ते पुरवठा करतात. त्यामुळे ग्राहक जास्त व मीटर कमी असा प्रकार होत असल्याचे कर्मचारी खाजगीत बोलताना सांगतात. यासंदर्भात अभियंता बोंगाडे म्हणाले, अशा ग्राहकांना आमच्याकडे पाठवा, त्यांना नियमित करुन घेण्यात येईल. (वार्ताहर)