तीन शिक्षकांसह लिपिक, ग्रामसेवकास पकडले
By Admin | Updated: December 12, 2014 00:52 IST2014-12-12T00:35:59+5:302014-12-12T00:52:18+5:30
जालना : जुना जालन्यातील भोईपुरा भागात गुरूवारी सायंकाळी पोलिसांच्या विशेष पथकाने जुगार अड्डयावर छापा मारून सहा जणांना अटक केली.

तीन शिक्षकांसह लिपिक, ग्रामसेवकास पकडले
जालना : जुना जालन्यातील भोईपुरा भागात गुरूवारी सायंकाळी पोलिसांच्या विशेष पथकाने जुगार अड्डयावर छापा मारून सहा जणांना अटक केली. यामध्ये तीन शिक्षकांसह लिपिक व ग्रामसेवकाचा समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या भागात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा मारून सहा जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
आरोपींच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य, १९ हजार रुपये रोख, तीन मोटारसायकल असा एक लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह व पोलिस उपअधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विभूते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, पोलिसांनी जुगाराविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली असून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ती राबविण्यात येत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी याबाबतचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकारामुळे सायंकाळनंतर भोईपुरा व जुना जालना भागात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद नव्हती. (प्रतिनिधी)