४०० रुपयांची लाच घेताना लिपिक जाळ्यात
By Admin | Updated: December 8, 2015 00:10 IST2015-12-07T23:55:52+5:302015-12-08T00:10:52+5:30
औरंगाबाद : जालना येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या कनिष्ठ लिपिकाला ४०० रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.

४०० रुपयांची लाच घेताना लिपिक जाळ्यात
औरंगाबाद : जालना येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या कनिष्ठ लिपिकाला ४०० रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. सोमवारी ही कारवाई औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जालना येथे केली. शिपाई पदावर कार्यरत महिला कर्मचाऱ्याचे नोव्हेंबर महिन्याचे पगार बिल काढण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.
दिनेश कोकाटे (रा. चाणक्य कॉम्प्लेक्सच्या बाजूला, जालना) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. कोकाटे याच्याकडे तेथील कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांची बिले तयार करण्याचे काम आहे. तक्रारदार या तेथे शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे पगार बिल तयार करण्यासाठी कोकाटे याने ४०० रुपयांची लाच मागितली. महिला कर्मचाऱ्यास लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी औरंगाबादेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे याची पडताळणी करण्यात आली. कोकाटेने सोमवारी लाचेची रक्कम जालना येथे आणून देण्यास सांगितल्यावरून सोमवारी सकाळी ११ वाजता सापळा रचून त्याला पकडण्यात आले. औरंगाबादेत सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक विवेक सराफ, पो.नि. अनिता वराडे, श्रीराम नांदुरे, सुनील फेपाळे, अजय आवले, सचिन शिंदे, शेख मतीन यांनी केली.