सहकारमंत्र्यांच्या ‘लोकमंगल’ला क्लिनचिट
By Admin | Updated: December 29, 2016 23:59 IST2016-12-29T23:55:25+5:302016-12-29T23:59:58+5:30
उस्मानाबाद : पालिका निवडणूक कालावधीत स्थिर पथकाने उमरगा चौरस्ता येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल मल्टीस्टेट’ची ९१ लाख ५० हजारांची रक्कम जप्त केली होती.

सहकारमंत्र्यांच्या ‘लोकमंगल’ला क्लिनचिट
उस्मानाबाद : पालिका निवडणूक कालावधीत स्थिर पथकाने उमरगा चौरस्ता येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल मल्टीस्टेट’ची ९१ लाख ५० हजारांची रक्कम जप्त केली होती. या प्रकरणी आयकर विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला असून, या अहवालात लोकमंगलला क्लिनचिट दिल्याने जप्त केलेली रक्कम परत देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या स्थिर पथकाकडून १६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान उमरगा चौरस्ता येथे सोलापूरहून उमरग्याकडे येणाऱ्या व दर्शनी भागात ‘लोकमंगल’चे चिन्ह असलेल्या जीप (क्र. एमएच १३/ बीएन ८६५६) मध्ये ९१ लाख ५० हजारांची रोकड मिळून आली होती. या रकमेबाबत पथकाने जीपचालक व जीपमधील अन्य एका व्यक्तीकडे चौकशी केल्यानंतर ही रक्कम लोकमंगल बँकेच्या इतर शाखांमधून आणली असून, उमरगा येथील लोकमंगल पतसंस्थेचे पैसे घेऊन जाण्यासाठी इकडे आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ठोस उत्तरे न मिळाल्याने सदरील पथकाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही रक्कम वाहनासह पोलिस ठाण्यात जमा केली. ही रक्कम जिल्हा कोषागारात जमा करण्यात आली होती. या एकूणच प्रकरणाची चौकशी आयकर विभागाकडून झाल्यानंतर विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला असून, यात लोकमंगलला क्लिनचिट दिल्याचे स्पष्ट होते.