सफाई कामगारांचा मनपात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:20 IST2017-09-05T00:20:45+5:302017-09-05T00:20:45+5:30
तीन महिन्यांच्या थकित वेतनासाठी कंत्राटी सफाई कामगारांनी सोमवारी महापालिकेत आयुक्तांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. दोन दिवसांत या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सफाई कामगारांचा मनपात ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : तीन महिन्यांच्या थकित वेतनासाठी कंत्राटी सफाई कामगारांनी सोमवारी महापालिकेत आयुक्तांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. दोन दिवसांत या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरात सफाई करणाºया कंत्राटी कामगारांचे वेतन नियमित होत नसल्याने त्यांच्यावर उपामारीची वेळ आली आहे. याबाबत मराठवाडा नगरपालिका, महानगरपालिका कामगार, कर्मचारी युनियनने वारंवार आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलनात सफाई कामगारांचे वेतन नियमितपणे दरमहा १० तारखेला करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ते आश्वासन पाळले नाही. याचवेळी मार्च, एप्रिल आणि जुलै महिन्याचे थकित वेतनही सफाई कामगारांना मिळाले नाही. सप्टेंबर उजाडला तरी जुलैचा पगार अद्याप झाला नाही. परिणामी हे कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत. शहरात झालेल्या अतिवृष्टीचा फटका या कामगारांना मोठ्या प्रमाणात बसला आहे, दुसरीकडे महापालिका कंत्राटी सफाई कामगारांना आवश्यक साहित्यही पुरवत नाही. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी नाही. रात्रपाळीमध्ये काम करणाºया कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन अद्याप थकित आहे. कर्मचाºयांना पगारपत्रक द्यावे, उपरोक्त प्रश्न त्वरित सोडवावेत आदी मागण्यांसाठी सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. महिला सफाई कामगारांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ. के. के. जामकर, कार्याध्यक्ष प्रदीप नागापूरकर यांनी यावेळी कंत्राटी कामगारांची भूमिका मांडली. कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त गुलाम सादीक यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.