बसस्थानकात साफसफाई, कंत्राटदारास आकारला दंड
By Admin | Updated: November 12, 2014 00:24 IST2014-11-12T00:08:59+5:302014-11-12T00:24:46+5:30
जालना : ‘बकाल बसस्थानक’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’च्या ११ नोव्हेंबर रोजीच्या हॅलो जालना अंकातून वृत्त प्रकाशित होताच मंगळवारी सकाळपासून एस.टी. महामंडळ विभागाचे प्रशासन सतर्क झाले

बसस्थानकात साफसफाई, कंत्राटदारास आकारला दंड
जालना : ‘बकाल बसस्थानक’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’च्या ११ नोव्हेंबर रोजीच्या हॅलो जालना अंकातून वृत्त प्रकाशित होताच मंगळवारी सकाळपासून एस.टी. महामंडळ विभागाचे प्रशासन सतर्क झाले. संपूर्ण स्थानकामध्ये साफसफाई करून सुलभ स्वच्छतागृहाच्या स्वच्छता एजन्सीचालकास एक हजार रुपये दंडही आकारण्यात आला आहे.
बसस्थानकातील अस्वच्छतेचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याकडे ‘लोकमत’ ने लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर सकाळपासून जालना आगारामधील अधिकारी मंडळी कामाला लागली. तीन-चार खाजगी कामगारांना तात्काळ पाचारण करून प्लॅटफार्म परिसर तसेच वाहक-चालकांचे आरामगृह स्वच्छ करून घेण्यात आले.
या आरामगृहाची अनेक दिवसांपासून सफाई झालेली नव्हती. त्यामुळे तेथे भिंतींना जाळेही कायम होते. तेथील स्वच्छतागृहाची देखील सफाई करण्यात आली.
परिसर स्वच्छतेच्या कामाचे कंत्राट ज्या एजन्सीकडे होते, त्यांचा कालावधी ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी संपलेला आहे. परंतु नवीन कंत्राटसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुमारे महिनाभर लांबणीवर पडणार होती. परंतु लोकमत च्या वृत्तामुळे ही निविदा प्रक्रिया आता दोन दिवसांतच काढण्यात येणार असल्याचे खुद्द आगारप्रमुखांनीच सांगितले.
पाण्याच्या टाकीतील पाणी सांडपाणी म्हणून वापरात येत असल्याचे आगारप्रमुख व्ही.एम.वाकोडे यांनी सांगितले. आगाराच्या मालकीच्या दोन टँकरद्वारे पाणी आणून ते प्रवाशांना पिण्यासाठी दुसऱ्या टाकीद्वारे दिले जाते, असेही सांगण्यात आले.
स्थानकातील कचराकुंडीत परिसरातील काही व्यावसायिक दररोज रात्री कचरा आणून टाकतात, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ही कुंडी दररोज भरते. परंतु नगरपालिकेमार्फत घंटागाडी किंवा ट्रॅक्टरद्वारे या कुंडीतील कचरा वाहून घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)
स्वच्छतागृहाचे कंत्राट असणाऱ्या सुलभ इंटरनॅशनल एजन्सीचालकाकडून कामात हलगर्जीपणा होत असल्याबद्दल तसेच महिला व लहान मुलांना शौचालय मोफत असताना त्यांच्याकडून पैसे आकारण्यात येत असल्याबद्दल जालना आगाराने एजन्सीला एक हजार रुपयांचा दंड केला आहे. याबाबतची नोटीस संबंधित एजन्सीला बुधवारी बजावण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख वाकोडे यांनी सांगितले.