क्लीन औरंगाबाद; ग्रीन औरंगाबाद व्हावे
By Admin | Updated: August 28, 2014 00:24 IST2014-08-28T00:04:55+5:302014-08-28T00:24:05+5:30
नजीर शेख, औरंगाबाद शहराचे सध्याचे चित्र पाहता ते फारसे आशादायक नाही.

क्लीन औरंगाबाद; ग्रीन औरंगाबाद व्हावे
नजीर शेख, औरंगाबाद
शहराचे सध्याचे चित्र पाहता ते फारसे आशादायक नाही. मलिक अंबरने वसविलेल्या या शहरात आता कचऱ्याचे ढीग, घाणेरडे नाले, प्रदूषित खाम नदी, नाल्यामध्ये फुटलेल्या ड्रेनेजलाईन, पाणी शुद्धीकरणाची मोडकळीला आलेली यंत्रणा, रस्त्यांच्या साफसफाईचा अभाव यामुळे ऐतिहासिक शहराची चांगली अवस्था आहे, असे म्हणता येणार नाही. त्यासाठी किमान तीन वर्षांचा मास्टर प्लॅन तयार करून ‘क्लीन औरंगाबाद : ग्रीन औरंगाबाद’ ही मोहीम राबवायला पाहिजे, असे मत क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद खैरनार यांनी व्यक्त केले.
‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात खैरनार म्हणाले की, अशी मोहीम राबविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन राजकीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, जिल्हाधिकारी, सिडको प्रशासक, शासनाचे विविध विभाग, आरोग्य खाते, पोलीस, प्रदूषण विरोधी मंडळ, वनखाते, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये आणि नागरिकांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात यावी. क्लीन औरंगाबादसाठी सर्वांत आधी प्रदूषित आणि अरुंद झालेली खाम नदी प्रदूषणमुक्त करणे, त्यावरील अतिक्रमणे काढणे हे काम करावे लागेल. शहरातील अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त नाले हा जीवघेणा प्रकार आहे. या नाल्यांची सफाई अनेक वर्षांपासून केवळ कागदावरच चालू आहे. त्यासाठी नाल्यांची वर्षातून किमान तीन वेळा सफाई करणे गरजेचे आहे.
पर्यटनाची राजधानी असलेल्या या शहरात स्वच्छतेबाबत कमालीची अनास्था आढळून येत आहे. याची पहिली जबाबदारी नागरिकांची आहे. कचऱ्याचे ढीग का लागताहेत याचा विचार नागरिकांनीच करायला हवा. दुसरी जबाबदारी महापालिकेची आहे. त्यांनी वेळेवर कचरा, नाले साफ करायला हवेत. हे माझे शहर आहे आणि ते मी कोणत्याही परिस्थितीत अस्वच्छ होऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञाच प्रत्येकाने करायला हवी. या प्रत्येकामध्ये व्यक्ती, संस्था, अधिकारी, सामाजिक संस्था, हॉस्पिटल्स आदी सर्व जण आले.
कालबद्ध कार्यक्रम हवा
आतापर्यंत माझ्या मते ‘स्वच्छ औरंगाबाद’ या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आलेला नाही. जगाचा विचार केल्यास पहिल्या तीन स्वच्छ शहरांमध्ये आफ्रिका आणि गल्फ प्रदेशातील शहरांचा समावेश आहे. युरोप आणि अमेरिकेत शहरे स्वच्छच आहेत; परंतु दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात केपटाऊनसारखे स्वच्छ आणि सुंदर शहर पाहायला मिळते. याचा अर्थ मनात आणले तर आपणही ते करू शकतो. यासाठी तीन वर्षांचा ‘क्लीन औरंगाबाद : ग्रीन औरंगाबाद’ हा कार्यक्रम राबवायला हवा. घराची स्वच्छता, गल्लीची स्वच्छता, वॉर्डाची स्वच्छता आणि शेवटी शहराची स्वच्छता, असा क्रम तयार करून त्याचे वेळापत्रकही तयार करता येईल. आठवड्यातील एक दिवस किंवा काही तास प्रत्येकाने या शहराच्या स्वच्छतेमध्ये आपले योगदान दिले पाहिजे, असा आग्रह धरायला हवा. आज जालना रस्त्यावर किंवा बीड बायपासवर आपण नजर टाकली, तर एक झाड दिसणार नाही. आणखी काही वर्षांनी विस्तारणाऱ्या शहराच्या रस्त्याचे हेच चित्र असेल. यासाठी आताच नियोजन करण्याची गरज आहे. जागोजागी असणारी उद्याने स्वच्छ आणि सुंदर असावीत. काही खाजगी संस्थांना किंवा गणेश मंडळे, युवक मंडळे, एनएसएसचे विद्यार्थी यांना अशी उद्याने स्वच्छ ठेवण्याचे काम दिले पाहिजे. आपले औरंगाबाद शहर सध्या हरित औरंगाबाद शहर आहे, असे वाटतच नाही. यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याची गरज आहे. घनकचरा व्यवस्थापनाची शास्त्रीय पद्धत राबविणे, चौक मोठे करून त्यांचे सुशोभीकरण करणे, नागरिकांसाठी ‘झाड दत्तक योजना’ ही योजना सुरू करणे, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग घेऊन स्वच्छता दूत तयार करणे ज्यायोगे शहरातील स्वच्छतेवर देखरेख केली जाईल.
‘क्लीन आणि ग्रीन औरंगाबाद’साठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून महापालिकेने विशेष निधी मिळवायला पाहिजे. आज आपल्या शहरात जपानचे काही लोक येतात आणि स्वच्छतादूत म्हणून आपल्याला काही गोष्टी शिकवितात, ही खरे तर आपल्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. महापालिकेने याची वेळीच दखल घेतली पाहिजे. ‘क्लीन आणि ग्रीन औरंगाबाद’ या मोहिमेसाठी मी व्यक्तिश: तसेच माझी मराठवाडा कन्स्ट्रक्शन कंपनी यामध्ये मोठे योगदान द्यायला तयार आहोत.
हे सर्व कशासाठी करायचे ?
‘क्लीन औरंगाबाद : ग्रीन औरंगाबाद’ ही मोहीम यासाठी राबवायची की यामधून पर्यटन वाढेल, मल्टीनॅशनल कंपन्यांना आकर्षित करणे, त्याद्वारे रोजगाराच्या संधी वाढतील, वैयक्तिक आणि परिसर स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांमध्ये पटवून देणे, आपला ऐतिहासिक वारसा जपणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, नागरिकांना चांगले आरोग्य लाभेल आणि आपल्या भावी पिढीला आपण काही देऊ शकू यासाठी हा सारा खटाटोप करणे आवश्यक आहे.