शिक्षण विभागात भरविला वर्ग
By Admin | Updated: July 6, 2014 00:21 IST2014-07-06T00:03:19+5:302014-07-06T00:21:32+5:30
बीड : माजलगाव तालुक्यातील डुब्बाथडी येथे शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शनिवारी शिक्षणाधिकारी यांच्या दालनात वर्ग भरवला.

शिक्षण विभागात भरविला वर्ग
बीड : माजलगाव तालुक्यातील डुब्बाथडी येथे शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शनिवारी शिक्षणाधिकारी यांच्या दालनात वर्ग भरवला. त्यानंतर शिक्षक द्या शिक्षक, अशी घोषणाबाजी करुन दालन दणाणून सोडले.
डुब्बाथडी येथे पाचवीपर्यंत शाळा आहे. मागील दोन वर्षापासून कायमस्वरुपी शिक्षक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. शिक्षक देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे वारंवार निवेदने दिली. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी गावकऱ्यांनी वाहनातून विद्यार्थी बीडमध्ये आणले.
प्रभारी शिक्षणाधिकारी प्रा. एस. वाय. गायकवाड यांच्या दालनात वर्ग भरवण्यात आला. भाजपा जिल्हा सरचिटणीस भाई गंगाभिषण थावरे, मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मस्के यांची उपस्थिती होती.
शिक्षकांचे लाड थांबवा
जि.प.मध्ये शिक्षकांची दर्जावाढ, समायोजनाची प्रक्रिया पार पडली. परंतु त्यात मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचा बीड, अंबाजोगाईसाठी हट्ट आहे. माजलगावात आजही शिक्षकांच्या २८ जागा रिक्त आहेत. शिक्षकांचे लाड थांबवा, त्यांना सक्तीने शाळेवर पाठवा, अशी मागणी भाई थावरे यांनी केली.(प्रतिनिधी)