उघड्या वाळू वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त; अपघातही वाढले
By Admin | Updated: June 16, 2014 01:13 IST2014-06-16T00:01:47+5:302014-06-16T01:13:09+5:30
धारूर: सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास उघड्यावर वाळू वाहतूक केली जात आहे. खाजगी वाहनधारक क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे.

उघड्या वाळू वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त; अपघातही वाढले
धारूर: सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास उघड्यावर वाळू वाहतूक केली जात आहे. खाजगी वाहनधारक क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. ही वाळू झाकून नेत नसल्याने याचा त्रास सर्वसामान्यांसह दुचाकीस्वारांना होत आहे. दुचाकीस्वार आदी वाहनधारकांना या वाळूचा त्रास होत आहे. अवैध व उघड्यावर वाळू वाहतूक केली जात असतानाही प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येत आहे.
तेलगाव-धारूर-केज हा रस्ता तालुक्यातील प्रमुख वाहतुकीचा मार्ग आहे. या रस्त्यावर सध्या वाळू वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून ट्रक, ट्रॅक्टर, टिप्पर शिगोशिग भरून या रस्त्यावरून वाळू वाहतूक करीत आहेत. केज, कळंब, धारूर तालुक्यातील या रस्त्यावरून वाळू वाहतूक केली जाते. हे शिगोशिग भरलेली वाहने रस्त्यावरून जाताना वाळू सांडत जातात.
या वाहनातून रस्त्यावर पडलेल्या वाळूमुळे दुचाकी घसरून पडत आहेत, अशा घटना या अगोदर अनेकवेळा घडल्या आहेत.
अशा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रशासनाकडूनच अभय मिळत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत, डॉ. आसाराम घोळवे यांनी केला आहे. याबाबत तहसीलदार संदीप कुलकर्णी म्हणाले, आम्ही या वाहनांवर कारवाई करू, नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेऊ. (वार्ताहर)