शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांचा झाला खुळखुळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST2020-12-17T04:32:16+5:302020-12-17T04:32:16+5:30
औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी राज्य शासनाने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले. शहरात पाणी आणणाऱ्या जलवाहिन्यांचे ...

शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांचा झाला खुळखुळा
औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी राज्य शासनाने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले. शहरात पाणी आणणाऱ्या जलवाहिन्यांचे आयुष्य जसे संपलेले आहे तसेच अंतर्गत जलवाहिन्याही कमकुवत झाल्या आहेत. मंगळवारी शहरात ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटण्याचे सत्र सुरू होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले.
जुन्या शहरातील जलवाहिन्या नगर परिषद काळात टाकण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्यांचे आयुष्य किमान दोन दशकांपूर्वी संपलेले आहे. जलवाहिन्या बदलण्याकडे महापालिकेने कधीच लक्ष दिले नाही. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. मंगळवारी रात्री गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागील रोडवर जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी चौकात वाहत होते. ज्या ठिकाणी जलवाहिनी फुटली तेथे फुलांची झाडे विकणारे नागरिक आपल्या कुटुंबासह राहत होते. जलवाहिनी फुटल्याने या कुटुंबांची वाईट अवस्था झाली. फुटलेली जलवाहिनी एमआयडीसीची असू शकते असा युक्तिवाद महापालिकेकडून करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी कोणाची हे शोधण्याचे काम महापालिकेकडून करण्यात येत होते. पुंडलिकनगर जलकुंभावरून जाणारी ही जलवाहिनी ३०० मि.मी. व्यासाची असून, ती महापालिकेची असल्याचे उशिरा सांगण्यात आले.
मोंढ्यातील चौकात जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत होते. विशेष बाब म्हणजे जलवाहिनीतून पाणी वाया जात असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना नव्हती. ज्या अधिकाऱ्याकडे हा परिसर आहे, त्यांनी रात्री उशिरा माहिती घेतल्यानंतर गळती असल्याचे मान्य केले, तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी काम सुरू होणार असल्याचे नमूद केले. चंपा चौक येथे मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. मात्र, या ठिकाणी गळती नसल्याचा दावा संबंधित उपअभियंता यांनी केला.