शहरातील विडी उद्योग संकटात..!
By Admin | Updated: July 2, 2017 00:38 IST2017-07-02T00:36:33+5:302017-07-02T00:38:01+5:30
जालना : जीएसटी कर प्रणालीत विडी उद्योगावर २८ टक्के कर लागणार असल्याने या उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

शहरातील विडी उद्योग संकटात..!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जीएसटी कर प्रणालीत विडी उद्योगावर २८ टक्के कर लागणार असल्याने या उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कच्चा मालासाठी भरण्यात येणाऱ्या करावर परतावा मिळणार की नाही याबाबत संभ्रमावस्था असल्याने स्थानिक विडी उद्योगांनी शनिवारी कारखाने बंद ठेवले.
जालना शहरात विडी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सुमारे दोन हजार कामगार वेगवेगळ्या विडी कारखान्यात काम करतात. देशात एक जुलैपासून जीएसटी कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार विडी बनविण्यासाठी लागणाऱ्या तंबाखूवर २८ टक्के, तेंदू पत्त्यावर १८ टक्के, विडी बांधण्यासाठी लागणाऱ्या धाग्यावर पाच टक्के, तसेच पॅकिंग, रॅपर, लेबल, बॉक्स यावर १२ टक्के जीएसटी लागणार आहे. याचा मोठा फटका जालन्यातील मजूर, नांगर व गायछाप विडी उद्योगाला बसणार आहे. शिवाय तयार मालापासून विडी विक्रीपर्यंतच्या सर्वच पातळ्यांवर जीएसटी लागणार असल्याने विडी उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तयार माल नवीन दराने विक्री करायचा की, जुन्या या गोंधळामुळे स्थानिक विडी उद्योजकांनी विक्रीही बंद ठेवली आहे. शहरातील विडी उद्योजकांनी उत्पादन बंद ठेवल्याने हाताने विडी बनविणाऱ्या महिलांसह कारखान्यातील कामगारांच्या हाताला शनिवारी काम मिळाले नाही. आणखी आठवडाभरच अशीच परिस्थिती राहणार असल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.