धुक्याच्या दुलईत लपेटले शहर

By Admin | Updated: January 3, 2015 00:17 IST2015-01-03T00:11:25+5:302015-01-03T00:17:32+5:30

औरंगाबाद : अवकाळी पावसामुळे वातावरण बदलल्याने शुक्रवारी पहाटेपासून संपूर्ण शहर धुक्यात हरवले. अगदी सकाळी ११ वाजेपर्यंत अनेक भागांत धुके कायम होते.

City wrapped in fog | धुक्याच्या दुलईत लपेटले शहर

धुक्याच्या दुलईत लपेटले शहर

औरंगाबाद : अवकाळी पावसामुळे वातावरण बदलल्याने शुक्रवारी पहाटेपासून संपूर्ण शहर धुक्यात हरवले. अगदी सकाळी ११ वाजेपर्यंत अनेक भागांत धुके कायम होते. धुक्यामुळे सकाळच्या वेळी पन्नास फुटांच्या पुढे दिसणेही अशक्य झाले होते. त्यामुळे रहदारीवर परिणाम दिसून आला.
थंडीच्या लाटेचा सामना करणाऱ्या औरंगाबाद शहरात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस दाखल झाला आहे. अधूनमधून वेगवेगळ्या भागांत हा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर धुके निर्माण झाले आहे. शुक्रवारी पहाटे शहर आणि परिसरात सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती. सकाळच्या वेळी अगदी जवळचेही दिसत नव्हते. त्यामुळे वाहतूक रोडावली होती.
वाहनधारकांना हेडलाईट लावून वाहन चालवावे लागत होते. सकाळी ११ वाजेपर्यंत हे धुके काही प्रमाणात कायम होते. दुसरीकडे गारठा निर्माण झाल्यामुळे शहराच्या कमाल तापमानातही आज काही घट
दिसून आली. धुके आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सूर्यदर्शन होऊ शकले नाही. त्यामुळे कमाल तापमानही आज २४.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले.
दरम्यान, जिल्ह्यात बुधवारपासून अवकाळी पाऊस दाखल झाला आहे. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांत जिल्ह्यात सरासरी ९.११ मि. मी. पाऊस झाला. शुक्रवारी रात्रीही शहरात सुमारे तासभर पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे थंडीत मात्र चढउतार होत आहे.

Web Title: City wrapped in fog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.