शहर स्वच्छतेला प्राधान्य देणार-गोरंट्याल
By Admin | Updated: December 27, 2016 00:12 IST2016-12-27T00:11:41+5:302016-12-27T00:12:55+5:30
जालना : नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनी दिली.

शहर स्वच्छतेला प्राधान्य देणार-गोरंट्याल
जालना : सर्वांना सोबत घेऊन आपण शहराला सुजलाम सुफलाम करणार आहोत.त्यासाठी सर्वांची साथ गरजेची आहे. शहर स्वच्छतेसाठी आपले प्राधान्य राहणार आहे. नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनी सोमवारी येथे दिली.
नगराध्यक्षा गोरंट्याल यांी सोमवारी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षा गोरंट्याल यांचे स्वागत केले.
नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या, जलवाहिनीचे काम २०१८ मध्ये पूर्ण होईल. नगर पालिकेला घंटागाड्याही प्राप्त झाल्या आहेत. त्याही लवकरच सुरू होणार आहेत. पथदिव्यांचाही प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. पेट्रोल व डिझेलचा खर्च आपण घेणार नसून हा खर्च शाळेला देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
नगर पालिकेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया सोमवारी झालेल्या विशेष सभेत पार पडली. यात उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह पाच स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. राऊत यांनी तिसऱ्यांदा उपाध्यक्ष होत हॅट्ट्रिक साधली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दुपारी बारा वाजता सभेला सुरूवात झाली. पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची उपस्थिती होती. निवड प्रक्रियेपूर्वी सर्व नगरसेवकांनी आपला परिचय करून दिला. प्रारंभ उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश राऊत तर भाजपाकडून अॅड. राहुल इंगोले यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात अॅड. इंगोले यांना २३ तर राजेश राऊत यांना ३९ मते पडली. १६ मतांची आघाडी घेत राऊत विजयी झाले. तर स्वीकृत सदस्यपदी पक्षीय बलाबलनुसार निवड झाली. काँग्रसेकडे २९ जागांचे बहुमत असल्याने दोन सदस्यांची निवड झाली. त्यात विजय चौधरी व शेख शकील यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली. भाजपाने १२ जागा मिळविल्या त्यानुसार भाजपाने चंपालाल भगत यांची निवड केली. शिवसेनेकडे ११ जांगाचे बहुमत आहे. शिवसेनेकडून शहरप्रमुख बाला परदेशी यांची निवड झाली. राष्ट्रवादीकडे ९ जागांचे बहुमत असून, जयंत भोसले यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली.
माजी आ. कैलास गोरंट्याल यांचे दुपारी दीड वाजता सभागृहात आगमन झाले. याप्रसंगी शिवसेनेचे गटनेते विष्णू पाचफुले, भास्कर दानवे, शाह आलम खान, गणेश राऊत आदींची भाषणे झाली.
दानवे म्हणाले, विकास कामे करताना राजकीय जोडे सभागृहाच्या बाहेर सोडावेत. नगर पालिकेत सुसज्ज सभागृह उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. विष्णू पाचफुले यांनीही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल या कोणताही पक्षीय भेदभाव न बाळगता सर्वांनाच मदत करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. शहआलम खान, अब्दुल हफिज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)