शहरातील रस्ते ‘चक्का जाम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:22+5:302021-07-07T04:06:22+5:30
औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या जालना रोडवरील वाहतूक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. क्रांतीचौकात दुपारी १ वाजेच्या ...

शहरातील रस्ते ‘चक्का जाम’
औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या जालना रोडवरील वाहतूक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. क्रांतीचौकात दुपारी १ वाजेच्या सुमारास आकाशवाणीकडून गोपाल टीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना सुमारे २० मिनिटे वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. यासोबतच जुन्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर सोमवारी आणि आज मंगळवारीही नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
शहरातील वाहतूक नियमन करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यरत आहे. सहायक पोलीस आयुक्तांसह, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि वाहतूक कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा या विभागाकडे आहे, असे असताना गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतूक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडून गेल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही चौकातील डाव्या लेनवर एकही वाहन उभे राहणार नाही, याची खबरदारी तेथे तैनात वाहतूक पोलिसांनी घेणे गरजेचे असते. क्रांतीचौकातील आकाशवाणीकडून गोपाल टी पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डावी लेन मंगळवारी दुपारी वाहनचालकांनी व्यापली होती. वाहनचालक यामुळे गोपाल टी पॉइंट, रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनचालकांना नाहक वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. यावेळी वाहनचालक वाहतूक सिग्नल तोडून वाहने पळविताना दिसले. विशेष म्हणजे एक वाहतूक कर्मचारी तेथे तैनात होता. या कर्मचाऱ्यांच्या हाताबाहेर ही वाहतूक गेल्याचे दिसून आले. तेथे तैनात वाहतूक कर्मचारी वेगवेगळ्या कॉर्नरवर जाऊन थांबत आणि वाहतूक नियमन करीत. यामुळे हा चौक ओलांडण्यासाठी वाहनचालकांना सुमारे १५ ते २० मिनिटे वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.
सेव्हन हिल ते सूतगिरणी रोडवरही दुपारच्या वेळी वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. जालना रोडवर आकाशवाणी चौकातही वाहनांची मोठी गर्दी दिसली.
-चौकट...
जुन्या शहरात वाहतूक कोंडी
शहराच्या प्रमुख बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, शहागंज, सिटीचौक, औरंगपुरा, चौराह, राजाबाजार आदी ठिकाणच्या प्रत्येक रस्त्यावर सोमवारी आणि मंगळवारी सलग दोन दिवस वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. अरुंद रस्त्यावर दुकानदार आणि त्यांचे ग्राहक वाहने उभी करतात. यातून ही कोंडी हाेत असल्याचे दिसून आले. वाहतूक पोलिसांचे जुन्या शहरातील रस्त्यावरील वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा फटका सामान्य वाहनचालकांना बसत आहे.