शहरावर शोककळा

By Admin | Updated: June 4, 2014 01:35 IST2014-06-04T01:23:15+5:302014-06-04T01:35:12+5:30

औरंगाबाद : लोकनेते, केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित होताच अनेकांनी हंबरडा फोडला.

The city mourns | शहरावर शोककळा

शहरावर शोककळा

 औरंगाबाद : लोकनेते, केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारित होताच अनेकांनी हंबरडा फोडला. कार्यकर्ते धायमोकलून रडले. शहरावर शोककळा पसरली. शहरातील चौकाचौकांतून मुंडे यांच्या प्रतिमा उभारून नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गोपीनाथ मुंडे मंगळवारी सकाळी शहरात येणार होते. दिल्लीतील निवासस्थानातून विमानतळाकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात होऊन ते गंभीर जखमी झाल्याचे वृत्त टीव्हीवरून दाखविले जात होते. तेव्हा अनेकांना हा अपघात किरकोळ असावा, साहेब अनेक अपघातांतून सहीसलामत वाचले आहेत, असाच विचार अनेकांच्या डोक्यातून चमकला; परंतु फक्त तासाभराच्या अवधीत पुढची दुर्दैवी बातमीही कानावर पडली. अनेकांचा या वृत्तावर विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी दिल्लीत फोन लावले. भाजपाचे शहराध्यक्ष बापू घडामोडे म्हणाले की, रॅलीच्या तयारीसाठी मी बाहेर पडणार होतो, तोच अपघाताची बातमी कळली. मी दिल्लीला खा. रावसाहेब दानवे यांना मोबाईलवरून विचारणा केली. दानवेही मुंडे साहेबांसोबत औरंगाबादला येणार होते. अपघाताचे वृत्त ऐकून दानवेही तिकडे निघाले होते; परंतु त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमीच समजली, असे सांगून ते ओक्साबोक्सी रडू लागले. मुंडे यांच्या निधनाच्या वृत्ताची खातरजमा करण्यासाठी सोशल मीडियावरून धडाधड पोस्ट टाकल्या जात होत्या. एकमेकांना फोन करून विचारणा केली जात होती. दरम्यानच्या कालावधीत कार्यकर्त्यांनी भाजपाचे उस्मानपुर्‍यातील शहर कार्यालय व शिरीष बोराळकर यांचे सिडकोतील प्रचार कार्यालय गाठले. या दोन्ही कार्यालयांत नेते, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. भाजपाचे प्रसिद्धीप्रमुख राम बुधवंत या कार्यकर्त्याच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. ते म्हणाले की, आता आम्ही सत्कार कुणाचा करावा. साहेबांचा आज सत्कार होता. जवाहर कॉलनी, गारखेडा, सिडको-हडकोतील नागरिक व व्यापार्‍यांनी दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली. गुलमंडीसह शहरातील बहुतांश प्रमुख चौकांतून मुंडे यांच्या प्रतिमाला पुष्पमाला अर्पण करून शोक व्यक्त केला गेला. मुकुंदवाडीसह काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी शामियाने टाकून मुंडे यांची प्रतिमा लावली व दिवसभर कार्यकर्ते तेथे बसून होते. घरातून लोक दिवसभर टीव्हीसमोर बसून होते. प्रमुख चौकांमध्ये डिजिटल होर्डिंग लावण्यात आले होते. गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र व बाजूला ‘गड आला; पण सिंह गेला’ असे लिहिले होते. गुलमंडी, पैठणगेट, कॅनॉट प्लेस, आविष्कार कॉलनी, औरंगपुरा, कुंभारवाडा, मछली खडक, अंगुरीबाग, दिवाण देवडी परिसरातील बहुतांश दुकाने उघडलीच नाहीत. सर्वत्र एकच चर्चा चौकाचौकांत, हॉटेलमध्ये तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद व अन्य कार्यालयांमध्ये एकच चर्चा होत होती. बँकेचे कर्मचारी दुपारच्या सुटीत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल चर्चा करीत होते. काल्डा कॉर्नर, ज्योतीनगर, सहकारनगर परिसरातही अनेक जण गटागटाने उभे राहून चर्चा करीत होते. जाधववाडी, मोंढ्यातील व्यवहार थंडावले बाजारपेठेत शोककळा पसरली होती. दुसरीकडे धान्याची मुख्य बाजारपेठ जाधववाडी व मोंढ्यातील व्यवहार पूर्णपणे थंडावले होते. अनेकांनी दुकान बंद ठेवले होते. आज शेतीमालाची आवकही कमी राहिली. पालेभाज्या, फळभाज्या मार्केटमध्येही नेहमीपेक्षा वर्दळ कमीच होती. चौकाचौकांत फलक भाजपा, शिवसेनेने चौकाचौकांत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली. काही चौकांत होर्डिंग उभारले होते. त्यात गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र व बाजूला ‘लोकनेता हरपला’ असा मजकूर होता. काही ठिकाणी फलकांवर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची वार्ता लिहिली होती.

Web Title: The city mourns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.