रिपाइंच्या मोर्चाने दणाणले शहर
By Admin | Updated: August 21, 2014 01:23 IST2014-08-21T00:46:00+5:302014-08-21T01:23:23+5:30
बीड : पावसाचे प्रमाण कमी असल्याने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासांठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या

रिपाइंच्या मोर्चाने दणाणले शहर
बीड : पावसाचे प्रमाण कमी असल्याने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासांठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये आठवले, पप्पु कागदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माळीवेस, सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे येऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या मोर्चामध्ये उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
यावेळी रामदास आठवले म्हणाले की, पुरेसा पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बीड जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची वेळ आली आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होणार यात शंका नाही. सत्तेवर आल्यास विधायक निर्णय घेण्यात येतील असेही आठवले म्हणाले. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन वर्ष उलटले तरी मारेकऱ्यांचा अद्याप तपास लागला नाही. ही अतिशय निंदनीय बाब असून आमची सत्ता आल्यास आरोपी पकडू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
रिपाइं युवा प्रदेश अध्यक्ष पप्पु कागदे म्हणाले, पावसाअभावी पिके उगवली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर करावी. गायरान जमिनीसंर्दभाचा जीआर वाढवून तो २०१० चा त्यात समावेश करावा असे कागदे म्हणाले. राजाभाऊ सरवदे, कांतीकुमार जैन, डॉ. विजय गोरे, मिलिंद शेळके, ब्रह्मानंद चव्हाण, अमर कसबे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांची भाषणे झाली.
दलितांवरील अत्याचार रोखण्यात यावेत व दलितांना संरक्षण देण्यात यावे, रमाई घरकुल योजनेला लागु करण्यात आलेली दारिद्रय रेषेची व पीआर कार्डची अट रद्द करावी, डीआरडीएकडील घरकुल योजना समाजकल्याणकडे वर्ग करावी, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे महामंडळाला १ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, एससी, ओबीसी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी आदी मागण्या झाल्या़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यात आल्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांची प्रकर्षाने आठवण झाली. येथे आल्यानंतर त्यांची नेहमीच भेट व्हायची. त्यांचे अपघाती निधन मनाला चटक लावुन गेले. ते महायुतीचे शिल्पकार होते असे सांगत मुंडे यांनी मी खासदार व्हावा यासाठी आग्रही भुमिका बजावली होती, असे आठवले म्हणाले.