धनगर समाजाच्या मोर्चाने शहर दणाणले

By Admin | Updated: August 8, 2014 00:33 IST2014-08-08T00:19:36+5:302014-08-08T00:33:49+5:30

उस्मानाबाद : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी ७ जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला.

The city of Dhangar community saw the city | धनगर समाजाच्या मोर्चाने शहर दणाणले

धनगर समाजाच्या मोर्चाने शहर दणाणले



उस्मानाबाद : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी ७ जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. आंदोलकांच्या गगनभेदी घोषणांनी शहर दणाणून निघाले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मागील पंधरा दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३१ जुलैपासून कमलाकर दाणे, संदीप वाघमोडे, यशवंत डोलारे, अनिल ठोंबरे यांनी अमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरूवारी धनगर समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दुपारी सव्वाएक वाजेच्या सुमारास मोर्चाला जिजाऊ चौक (बार्शी नाका) येथून प्रारंभ झाला. त्यानंतर हा मोर्चा भंडाऱ्याची उधळण करीत ढोल-ताशांच्या गजरात श्रीपतराव भोसले हायस्कूल, आर्य समाज चौक, शहर पोलिस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मोर्चामध्ये आरक्षण कृती समितीचे राज्य अध्यक्ष हनुमंत सुळ, सदस्य सुधाकर व्हट्टे, मच्छिंद्र ठवरे, डॉ. गोविंद कोकाटे, गणेश सोनटक्के, भारत डोलारे, दत्ता बंडगर, आश्रुबा कोळेकर, महानंद पैलवान, अ‍ॅड. खंडेराव चौरे, अभिमन्यु शेंडगे, राजाभाऊ वैद्य, बाळासाहेब खांडेकर, सुरेश कांबळे, गणेश एडके, राजाभाऊ देवकते, गोपने, मुसळे आदींसह हजारो समाजबांधव सहभागी झाले होते.
आंदोलन पक्षाच्या विरोधात
नाही : सूळ
धनगर समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ यांनी यावेळी बोलताना नमूद केले. स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतरही शासनाने या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच हे आंदोलन उभे करावे लागले. समाजबांधवांनी आरक्षणाचा लढा शांततेच्या मार्गाने लढावा, असे सांगतानाच धनगर समाजाचे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसल्याचेही सूळ यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: The city of Dhangar community saw the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.