शहर डेंजर झोनमध्ये!
By Admin | Updated: September 6, 2014 00:42 IST2014-09-06T00:40:22+5:302014-09-06T00:42:06+5:30
औरंगाबाद : शहरातील डेंग्यू व इतर साथरोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मार्ग नाही.

शहर डेंजर झोनमध्ये!
औरंगाबाद : शहरातील डेंग्यू व इतर साथरोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मार्ग नाही. शहरातील काही भागांमध्ये डेंग्यूचा प्रसार ४० टक्क्यांपर्यंत गेला आहे. डेंग्यूचा डास ४ कि़ मी. अंतरात प्रवास करतो. त्यामुळे डेंग्यू डासांची अंडी व रोगाचा प्रसार वेगाने झाला असून, अख्खे शहर डेंग्यूच्या विळख्यात आले आहे.
आॅगस्ट महिन्यात दोन कोम्बिंग आॅपरेशन झाले. ३ लाख घरांमध्ये अबेट वाटप करण्याचा दावा पालिकेने केला होता. असे असताना शहर ४० टक्के डेंग्यूच्या विळख्यात आलेच कसे हा प्रश्न आहे.
आज पुण्याहून आलेले बी. आर. माने, डॉ. सुतवणे, पवार, गोवाळे या तज्ज्ञांनी डेंग्यूच्या प्रसाराचा आढावा घेतला. पथकाने शहरातील एकतानगर, शहानूरमियाँ दर्गा, म्हाडा कॉलनी, मुकुंदवाडी, एन-११ या भागात पाहणी करून डास व रक्तांचे नमुने संकलित केले. एकतानगर परिसरात ८० टक्के डेंग्यूचा प्रसार झालेला आहे.
डेंग्यूसदृश वॉर्डातील डासांचे प्रकार, उगम केंद्र, डासांची घनता, ज्या भागात डेंग्यूसदृश आजाराने नागरिकांचा बळी गेला आहे, त्या भागाची पाहणी करून पथक परतले.
आयुक्त पी. एम. महाजन यांनी साथरोग नियंत्रणाबाबत आज आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून मोहीम राबविण्याचे आदेश दिले.
मनपाच्या ५ हॉस्पिटल्समध्ये ‘रॅपिड डेंग्यू टेस्ट’ ची व्यवस्था करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयात या टेस्टसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते. पालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये त्या टेस्ट उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांना लाभ होईल.
आरोग्य अधिकारी म्हणाल्या...
आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री कुलकर्णी म्हणाल्या, पथकाने साथरोगाने बळी गेलेल्या परिसराची पाहणी केली. पाच वॉर्डांतील डासांच्या घनतेचा व स्वच्छ पाण्यात घातलेल्या अळ्यांचा आढावा घेतला. प्रत्येक वॉर्डातील ३० घरांचे नमुने घेतले. मॅपिंग केसेस तयार केल्या आहेत. गंभीररीत्या डेंग्यूसदृश साथरोगाचा प्रसार होतो आहे. प्रभाग ‘ब’ व ‘ई’ मध्ये सर्वाधिक साथ पसरण्याचा धोका आहे. डेंग्यूचा डास दिवसा चावतो. एका वेळी तो १० जणांना चावतो. त्यामुळे नागरिकांना दिवसा काळजी घेणे महत्त्वाचे आहे.