शहर बससेवेला कंत्राटदार मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:53 IST2017-07-22T00:47:34+5:302017-07-22T00:53:07+5:30
नांदेड: शहर बससेवा चालविण्यास एसटी महामंडळ अपयशी ठरल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने ही सेवा खाजगी कंपनीकडे देण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या.

शहर बससेवेला कंत्राटदार मिळेना
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शहर बससेवा चालविण्यास एसटी महामंडळ अपयशी ठरल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने ही सेवा खाजगी कंपनीकडे देण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यासाठी काढलेल्या निविदेची मुदत संपली,परंतु एकही कंत्राटदार ही सेवा चालविण्यासाठी पुढे आला नाही़
मराठवाड्यातील झपाट्याने वाढ होणाऱ्या शहरामध्ये क्रमांक दोनचे शहर म्हणून नांदेडची ओळख आहे़ शिक्षण आणि आरोग्य सेवा देणाऱ्या शहरात दररोज हजारो लोक येतात़ आजघडीला शहराची लोकसंख्या आठ लाखांच्या घरात आहे़ यामध्ये शिक्षण, व्यवसाय आणि उद्योगासाठी राहणारी बहुतांश मंडळी वाहतुकीसाठी आॅटो, शहर बसेसचा वापर करतात़ खाजगी कंपन्या, उद्योग हे सर्वाधिक सिडको, हडको, कृष्णूर भागात आहेत़ तर शैक्षणिक सुविधा विष्णूपुरी परिसर आणि शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत़
शहरातील नागरिकांनी बससेवा देण्याची जबाबदारी महापालिकेची असून यापूर्वी भागीदारी तत्त्वावर अकोला येथील खाजगी कंपनीकडे कंत्राट दिले होते़ त्यांच्यामार्फत ही सेवा सुरु होती़ मनपा आणि कंत्राटदारासोबत झालेल्या वादानंतर ही सेवा एसटी महामंडळाकडे देण्यात आली़ आॅक्टोबर २०१० मध्ये जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत महापालिकेस मिळालेल्या ३० बसेस एसटीकडे चालविण्यासाठी देण्यात आल्या़ यामध्ये १० मोठ्या आणि २० लहान बसेसचा समावेश होता़ सेंसर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या बसेस नांदेडकरांना सेवा देत होत्या़
नवीन गाड्यांमुळे नांदेडकरांनी बससेवेला चांगला प्रतिसाद दिला़ महामंडळाला उत्पन्नही चांगले मिळाले होते़, परंतु बसमधील तांत्रिक बिघाडामुळे अल्पावधीतच ही सेवा कोलमडली़ तोट्यात सुरु असलेली ही सेवा आता अखेरच्या घटका मोजत आहे़ त्यामुळे मनपाने ही सेवा पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरु करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत़,परंतु ही सेवा चालविण्यासाठी सद्य:स्थितीत एकही कंत्राटदार पुढे आला नाही, हे विशेष!