सीताफळ बाजारपेठ दलालांच्या विळख्यात
By Admin | Updated: October 23, 2014 00:16 IST2014-10-22T23:24:41+5:302014-10-23T00:16:30+5:30
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई डोंगर परिसरात पिकणाऱ्या पण मोठ्या शहरात मोठी मागणी असलेले सीताफळ या फळाची बाजारपेठ अंबाजोगाईत मोठ्या प्रमाणात फुलली असून अंबाजोगाई शहरासह बाहेर गावाहून

सीताफळ बाजारपेठ दलालांच्या विळख्यात
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
डोंगर परिसरात पिकणाऱ्या पण मोठ्या शहरात मोठी मागणी असलेले सीताफळ या फळाची बाजारपेठ अंबाजोगाईत मोठ्या प्रमाणात फुलली असून अंबाजोगाई शहरासह बाहेर गावाहून येणाऱ्या पर्यटकांची सिताफळ खरेदीसाठी मोठी झुंबड उडत आहे. मात्र, सामान्य ग्राहकांपेक्षा सीताफळ खरेदी करणाऱ्या दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्याने विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना या दलालांच्या विळख्यात अडकावे लागत आहे.
अंबाजोगाई शहर व परिसरात असणाऱ्या बालाघाटाच्या डोंगरपट्ट्यात असलेल्या डोंगरदऱ्यात मोठ्या प्रमाणात सिताफळाची झाडे आहेत. तसेच येल्डा, चिचखंडी, कुरणवाडी, काळवटी तांडा, या परिसरात सीताफळांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. दसरा ते दिवाळीच्या कालावधीत सीताफळाचा मोठा बहर असतो.
या परिसरातील ग्रामस्थांना दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी सिताफळाच्या विक्रीतून उपलब्धी प्राप्त होते. डोंगर कपारीत जाऊन आपल्या कुटुंबासह सीताफळ गोळा करायची व ती अंबाजोगाईत आणून विकायची. या कामावरच या परिसरातील अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. सकाळी सात वाजल्यापासूनच सीताफळांच्या डाला योगेश्वरी मंदिराच्या परिसरात विक्रीसाठी येतात.
बाहेरगावाहून योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सीताफळ खरेदीसाठी मोठी गर्दी होते. सीताफळाची एक डाल किमान दोनशे ते तीनशे रुपयांपर्यत विक्री होते. सकाळी दहापर्यंत ही विक्री करून शेतकरी आपल्या गावी निघून जातात. केवळ जोडधंदा म्हणून व्यवसाय करणाऱ्या या शेतकरी व शेतमजुरांची मात्र आता या क्षेत्रात दलालांनी शिरकाव केल्याने उपेक्षा होऊ लागली आहे.
अंबाजोगाईत सकाळी सीताफळे विक्रीसाठी येताच येथे टेम्पो लावून सीताफळे खरेदी केली जातात व मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात नेऊन या सीताफळांची पाच ते दहा पट जादा भावाने विक्री केली जाते. परिणामी डोंगर कपारीत दिवसभर वणवण करीत सीताफळे गोळा करणाऱ्या मजुरांपेक्षा दलालांचेच फावते आहे. अंबाजोगाईत सीताफळ संशोधन केंद्र सरकारने स्थापन केले. मात्र, या सीताफळांना शीतगृह अथवा माल साठविण्यासाठी कसल्याही सुविधा उपलब्ध झाल्याने दलालांचं चांगभलं, अशी अवस्था झाली आहे.
इतर धान्य व फळांबरोबरच रानमेवा असलेल्या सीताफळ फळांवरही दलालांचे अतिक्रमण झाल्याने या परिसरातील शेतकरी व मजुरांची मोठी उपेक्षा होऊ लागल्याचे चित्र अंबाजोगाई तालुक्यात दिसून येत आहे.