वाढीव बिलामुळे नागरिक हैराण
By Admin | Updated: December 31, 2014 01:06 IST2014-12-31T00:19:46+5:302014-12-31T01:06:56+5:30
औरंगाबाद : आधी तीन हजार रुपयांपर्यंत वीज बिल येत होते, आता थेट नऊ हजार रुपये आले... पाच महिन्यांनंतर थेट १ लाख रुपयांचे बिल आले...

वाढीव बिलामुळे नागरिक हैराण
औरंगाबाद : आधी तीन हजार रुपयांपर्यंत वीज बिल येत होते, आता थेट नऊ हजार रुपये आले... पाच महिन्यांनंतर थेट १ लाख रुपयांचे बिल आले... अशा प्रकारे अनेक ग्राहकांनी मंगळवारी वाढीव वीज बिलांबाबत जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत तक्रारी मांडल्या. दिवसेंदिवस ग्राहकांना वाढीव बिल येत असल्याने नागरिक हैराण होत असल्याचे चित्र बैठकीत दिसून आले.
जिल्हा विद्युकीकरण समितीचे अध्यक्ष खा. चंद्रकांत खैरे, आ. संदीपान भुमरे, आ. इम्तियाज जलील, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महावितरण कंपनीचे अधिकारी आदींची बैठकीस उपस्थिती होती.
यावेळी वीज बिलातील एलबीटीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला असता जीटीएलकडून एलबीटी वसूल करण्यात यावा, नागरिकांवर त्याचा भार टाकू नका, ग्राहकांनी यापुढे एलबीटी वगळून वीज बिल भरावे, एलबीटी रद्द झाल्याने आता वीज ग्राहकांना त्रास देऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या; परंतु हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय होईल, असे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेक तास पुरवठा खंडित राहतो.
कॉल सेंटरवरही संपर्क होत नाही, कर्मचारी उद्धट बोलतात, अशा तक्रारी मांडताना महावितरणपेक्षा जीटीएलची सेवा बरी होती, असा अनुभव येत असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले. वीज बिल लवकर मिळत नसल्याने एकदम वाढीव बिल आणि व्याज भरण्याची वेळ येत असल्याची तक्रारही यावेळी अनेकांनी केली.
शहरात वीज ग्राहकांसाठी जास्तीत जास्त कॉल सेंटर, चौकशी कक्ष, विशेष कक्ष स्थापन करण्याची सूचना करण्यात आली. जीटीएलच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी आपल्याला महावितरणमध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी केली.