शहर बसअभावी नागरिकांची पायपीट
By Admin | Updated: September 27, 2014 00:56 IST2014-09-27T00:43:24+5:302014-09-27T00:56:01+5:30
वाळूज महानगर : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलवाडीत शहर बसची सोय नसल्याने गोलवाडीवासीयांना दररोज दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

शहर बसअभावी नागरिकांची पायपीट
वाळूज महानगर : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलवाडीत शहर बसची सोय नसल्याने गोलवाडीवासीयांना दररोज दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. शहर बस सुरू करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने दिलेल्या ठरावाला एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
शहरापासून हाकेच्या अंतरावर असूनही गोलवाडी विकासापासून कोसो दूर आहे. साधी शहर बसची सुविधा नाही. नागरिकांना दररोज दोन कि़ मी. गोलवाडी फाट्यापर्यंत पायपीट करावी लागते. येथेही बस थांबेल की नाही याची खात्री नाही. गावातील ३५ पेक्षा अधिक विद्यार्थी शहरात शिक्षण घेतात. सर्वांनी बसचे पास काढले आहेत. परंतु गावात शहर बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना रोज गाव ते औरंगाबाद- नगर रस्ता, असा पायी प्रवास करतच ये-जा करावी लागत आहे. बहुतांशी बस बजाजनगर, पंढरपूर येथूनच भरून येतात. त्यामुळे बसचालक गोलवाडी फाट्यावर बस उभी न करता निघून जातात. महिन्याचा बस पास असूनही खाजगी वाहनाने ये-जा करावी लागत असल्याने अधिकचा भुर्दंडही विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे.
खाजगी वाहनांच्या असुरक्षित प्रवासामुळे मुलींना शाळेत पाठवायला बहुतांशी पालक असमर्थता दाखवत आहेत. वेळेवर बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे तास बुडत असून, नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय व शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने १९ आॅगस्टला एस. टी. महामंडळाला पत्र देऊन गोलवाडी ते औरंगपुरा शहर बस सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु एस. टी. महामंडळाने ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे.
एस. टी. महामंडळाने गोलवाडीसाठी स्वतंत्र शहर बस सुरू करावी, अशी मागणी सरपंच सुभान शेख, उपसरपंच यमुना धोंडरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जैस्वाल, शांताबाई कीर्तिशाही, केरुबा कसारे, आरती सलामपुरे, छगन सलामपुरे, किसन धांडे, गंगाराम कणसे, प्रभात तिरछे, आकाश सलामपुरे, शामा केवट, धोंडिराम सलामपुरे, अजय चौधरी, राजू सलामपुरे, सीता तिरछे, कमलेश सलामपुरे आदी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
यासंदर्भात एस. टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक संजय सुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोलवाडी ग्रामपंचायतीचे आलेले पत्र तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.