छत्रपती संभाजीनगर : शहरात अनेक मालमत्ताधारक नियमितपणे मालमत्ता कर भरत नाहीत. महापालिका त्या मालमत्ताधारकांच्या थकबाकीवर २४ टक्के चक्रवाढ पद्धतीने व्याजआकारणी करते. व्याजाची रक्कम पाहून अनेक मालमत्ताधारक कर भरत नाहीत. मनपा प्रशासनाने १५ जुलैपासून ९५ टक्के व्याजमाफीची योजना सुरू केली. त्यामुळे ८ हजार ८१४ मालमत्ताधारकांनी मागील १२ दिवसांत तब्बल १३ कोटी २८ लाख रुपये भरले. कर भरण्यासाठी काही वॉर्ड कार्यालयांमध्ये रांगा लागत आहेत.
मालमत्ता कर एकरकमी भरल्यास व्याजावर ९५ टक्के सूट देण्याची योजना १५ जुलैपासून सुरू आहे. पहिल्याच दिवशीपासूनच १ कोटींहून अधिक रक्कम वसूल होत आहे. दररोज ८०० ते ९०० मालमत्ताधारक योजनेचा लाभ घेत आहेत. मनपाच्या दहा वॉर्ड कार्यालयांमध्ये २६ जुलैपर्यंत ८ हजार ८१४ मालमत्ताधारकांनी १३ कोटी २८ लाख रुपये भरल्याची माहिती मनपातील सूत्रांनी दिली. वसुलीचा हा ट्रेंड लक्षात घेता महिनाभरात किमान ४० ते ४५ कोटी रुपये वसूल होतील, अशी अपेक्षा आहे. जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी व्याजमाफीचा लाभ घ्यावा यासाठी मनपाकडून शिबिरेही सुरू आहेत. वॉर्ड कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी गर्दी होत आहे.
पुढील महिन्यात ७५ टक्के माफी१५ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत ‘शास्ती से आझादी’ योजनेत व्याजावर ९५ टक्के माफी दिली आहे. त्यासाठी संपूर्ण थकीत कर एकरकमी भरणे आवश्यक आहे. १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरपर्यंत व्याजावर ७५ टक्के माफी मिळेल.