नागरिकांना नैसर्गिक विधीची धास्ती !
By Admin | Updated: January 8, 2017 23:53 IST2017-01-08T23:50:27+5:302017-01-08T23:53:04+5:30
जालना जालना शहरात पाय ठेवलेल्यांना धास्ती असते ती नैसर्गिक साद आल्यास त्याला कुठे प्रतिसाद द्यावा

नागरिकांना नैसर्गिक विधीची धास्ती !
हरी मोकाशे जालना
नैसर्गिक साद आली की त्यास प्रतिसाद द्यावाच लागतो. परंतु, जालना शहरात पाय ठेवलेल्यांना धास्ती असते ती नैसर्गिक साद आल्यास त्याला कुठे प्रतिसाद द्यावा. शहरात केवळ दोनच सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याने अडोश्याची जागा पाहून ‘मोकळे’ व्हावे लागते. हागणदरीमुक्तीचा गवगवा करणाऱ्या नगर पालिकेचे नियोजन मात्र कागदावरच राहात असल्याचे पहावयास मिळत आहे.
औद्योगिक क्षेत्रामुळे विविध साहित्य खरेदीसाठी शहरात दररोज हजारो व्यापाऱ्यांची वर्दळ असते. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणामुळे विविध कामांसाठी ये- जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु, शहरात दाखल होणाऱ्यांना भिती असते ती लघुशंकेची. शहरात केवळ दोन ठिकाणीच सुलभ शौचालये असल्याने परगावाहून आलेल्यांची धावाधावच सुरु असल्याचे पहावयास मिळते.
शहरातील फुलबाजार, भोकरदन नाका, मामा चौक, पाणीवेस, गरीबशहा बाजार, मम्मादेवी चौक, शनि मंदिर, सराफा बाजार, महात्मा फुले मार्केट, अलंकार चौक, टांगा थांबा यासह जुन्या जालना शहरातील शनि मंदिर, भाजी मंडई आणि गस्तगड हे नेहमी गजबजलेले प्रमुख चौक असतात. परंतु, या ठिकाणी ना स्वच्छतागृह ना लघुशंका. त्यामुळे येथे आलेल्या नागरिकांना लघुशंका आल्यास भीतीच बसते. ती उरकण्यासाठी चक्क उघड्या जागेचा वापर करावा लागतो. स्वच्छतागृह, लघुशंकागृह नसल्याचे महिलांची मोठी कुचंबना होत आहे.
तीन ठिकाणी नियोजन...
शहरात सध्या १० सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यातील काहींची पडझड झाली असल्याने बंद आहेत. तसेच चार- पाच ठिकाणी लघुशंकागृहे असली तरी त्यातील दोन मोडकळीस आली आहेत. सध्या स्वच्छतेचा सर्व्हे सुरु असून फुले मार्केट, बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचे नियोजन असल्याचे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता रत्नाकर अडसरे यांनी सांगितले.