ग्रामपंचायतमधील दफ्तर तपासणीवर नागरिकांतून शंका
By Admin | Updated: July 13, 2014 00:17 IST2014-07-12T23:56:21+5:302014-07-13T00:17:52+5:30
पाटोदा: जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुरेशी यांनी पाटोदा ग्रामपंचायतची दफ्तर तपासणी केली होती.

ग्रामपंचायतमधील दफ्तर तपासणीवर नागरिकांतून शंका
पाटोदा: जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुरेशी यांनी पाटोदा ग्रामपंचायतची दफ्तर तपासणी केली होती. या तपासणीसंदर्भात पाटोदा येथे मात्र शंका- कुशंकांनी जोर चढला आहे. दफ्तर तपासणीदरम्यान ‘कुछ नही मिला’ असे कुरेशी वारंवार भ्रमणध्वनीवरून कोणाला तरी बोलत होते. याची तर नागरिकांतून अधिकच चवीने चर्चा होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ग्रामसेवक आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. या संपात पाटोदा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनीही सहभाग घेतलेला आहे. ग्रामसेवक संपावर असल्याने ग्रामपंचायतमधील कपाटांना कुलूप आहे. असे असले तरी कुरेशी यांनी बुधवारी दुपारी एक वाजता पाटोदा ग्रामपंचायतमध्ये येऊन दफ्तराची तपासणी केली. यावेळी तेथे प्रभारी गटविकास अधिकारी राख यांच्यासह जाधव, शिंदे हे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे कुरेशी यांनी सर्व कागदपत्रांची मागणी केली. यावेळी कपाट बंद असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यानंतर कपाटाचे कुलूप तोडून तपासणी केली.
ही तपासणी तब्बल तासभर चालली. यादरम्यान कुरेशी यांना वारंवार फोन येत होते. त्या फोनवर ‘कुछ नही मिला, अरे साब कुछबी नही मिला’ असे कुरेशी म्हणत असल्याचे उपस्थित इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले.
ग्रामसेवक संपावर असल्याची माहिती असतानाही कुरेशी यांनी कपाटाचे कुलूप तोडून तपासणी का केली? अशी कोणती गंभीर बाब होती की त्यासाठी कपाटाचे कुलूप तोडावे लागले? असे प्रश्न आता नागरिकांतून चौकाचौकात चर्चिले जाऊ लागले आहेत.
पाटोदा ग्रामपंचायतीअंतर्गत मागील काही वर्षांत कोट्यवधी रुपयांची कामे झालेली आहेत. अस्तित्वात नसलेल्या वसाहती, दलित वसाहत, बारावा व तेरावा वित्त आयोगातील कामे, राष्ट्रीय पेयजल, स्वजलधारा नळयोजना, शौचालय योजना अशा विविध कामांवर खर्च झालेला आहे. अशा कामासंदर्भात नागरिकांमधून वारंवार तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीची तपासणी झाल्यामुळे व कुरेशी यांच्या भ्रमणध्वनीवरील त्या वक्तव्यामुळे पाटोदा शहरात समज- गैरसमज वाढल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. या दौऱ्यानिमित्त नागरिकांतून शंकाही व्यक्त केली जात आहे. भ्रमणध्वनीवरील संभाषणाची तर नागरिक चवीने चर्चा करीत आहेत. (वार्ताहर)