मंगळसूत्र चोरट्यास नागरिकांनी पकडले

By Admin | Updated: June 14, 2017 00:38 IST2017-06-14T00:34:03+5:302017-06-14T00:38:24+5:30

वाळूज महानगर : बजाजनगर परिसरात सोमवारी (दि.१३) रात्री दोन महिलांचे मंगळसूत्र ओरबाडून दुचाकीवरून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वार भामट्यास नागरिकांनी पाठलाग करून वडगावात पकडले.

Citizens caught Mangalsutra Choratya | मंगळसूत्र चोरट्यास नागरिकांनी पकडले

मंगळसूत्र चोरट्यास नागरिकांनी पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : बजाजनगर परिसरात सोमवारी (दि.१३) रात्री दोन महिलांचे मंगळसूत्र ओरबाडून दुचाकीवरून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वार भामट्यास नागरिकांनी पाठलाग करून वडगावात पकडले. संतप्त नागरिकांनी भामट्यास बेदम चोप देऊन एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले.
लता सुपडू वराडे (३५) व त्यांच्या शेजारीण भारती धंडारे (रा. शिवालय चौक, बजाजनगर) या दोघी सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शतपावली करीत होत्या. त्रिमूर्ती शाळेसमोरून जात असताना गुलाबी रंगाचा शर्ट व गळ्यात भगवा रुमाल असलेला एक दुचाकीस्वार तरुण महिलांच्या पाठीमागून पुढे गेला. थोडे अंतर पुढे जाऊन त्याने तात्काळ यू-टर्न घेतला व मागे आला. लता वराडे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून इंद्रप्रस्थ कॉलनीकडे भरधाव निघून गेला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लता वराडे व भारती धंडारे यांनी आरडाओरड केल्याने वाटसरू जमा झाले. ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण भोळे यांनी या घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना देऊन काही तरुणांसह या भामट्याचा पाठलाग सुरूकेला.
मंगळसूत्र लांबविले
लता वराडे यांचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार भामटा इंद्रप्रस्थ कॉलनीच्या दिशेने गेला. रात्री १० वाजेच्या सुमारास सुलोचना खैरनार (३८, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी) या पतीसह अल्फोन्सा शाळेकडून स्टरलाईट कंपनीकडे शतपावली करीत जात असताना एक दुचाकीस्वार समोरून पाठीमागे गेला. काही क्षणांतच त्याने पुन्हा यू-टर्न मारत सुलोचना खैरनार यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका देऊन तोडले व धूम ठोकली. खैरनार पती-पत्नीने आरडा-ओरड केल्याने काही दुचाकीस्वारांनी त्या भामट्याचा पाठलाग सुरू केला.
चोरट्याला कट मारणे महागात पडले
दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर या भामट्याने इंद्रप्रस्थ कॉलनीतून भरधाव जाताना दुचाकीस्वार गजानन नावाच्या तरुणास कट मारला. त्यामुळे गजाननने त्याचा पाठलाग सुरू केला. हा पाठशिवणीचा खेळ सुरू असताना त्या भामट्याच्या दुचाकीचे पेट्रोल वडगावात संपले. दुचाकी उभी करून पळून जाण्याच्या तयारीत असताना गजाननने त्यास पकडून चोप दिला. ही हाणामारी सुरू असताना पाठलाग करणारे अन्य तरुण व दुचाकीस्वार तेथे पोहोचले. हाच तो मंगळसूत्र चोरटा असल्याचे लक्षात येताच संतप्त जमावाने त्यास बेदम मारहाण केली.

Web Title: Citizens caught Mangalsutra Choratya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.