विजेच्या कमी-अधिक दाबाने नागरिक त्रस्त
By Admin | Updated: May 9, 2015 00:53 IST2015-05-09T00:35:09+5:302015-05-09T00:53:10+5:30
जालना : शहरातील घायाळनगर, लोकमान्य प्राथमिक शाळा परिसरात विजेच्या कमी अधिक दाबामुळे नागरिक त्रस्त झाले असून, यामुळे विद्युत उपकरणे जळून नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.

विजेच्या कमी-अधिक दाबाने नागरिक त्रस्त
जालना : शहरातील घायाळनगर, लोकमान्य प्राथमिक शाळा परिसरात विजेच्या कमी अधिक दाबामुळे नागरिक त्रस्त झाले असून, यामुळे विद्युत उपकरणे जळून नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे.
घायाळनगर हे जालना शहराच्या मध्यवस्तीत आहे. गत महिन्यात वादळी वाऱ्यात गांधीचमनवरील खांब कोसळला होता. तो दुरूस्त करण्यात आला आहे. परंतु तेव्हापासून घायाळनगर परिसरात अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. या वीजपुरवठ्याबाबत येथील नागरिकांनी दोनवेळा लेखी तक्रार गांधीचमन येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात दिली आहे. शिवाय दूरध्वनीवरूनही याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना कल्पना दिलेली आहे. परंतु यावर काहीच उपाययोजना होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेच्या कमी अधिक दाबाने विद्युत पंप चालत नाहीत.
त्यामुळे पाणी असूनही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. नळांना पाणी आले तरी नळावरील मोटारीही चालत नाहीत. याशिवाय विजेवर आधारित उपकरणे जळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने दूरदर्शनसंच, फ्रीज, पंखे, मिक्सर, लाईट आदी जळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. याचा विनाकारण भूर्दंड मात्र, नागरिकांना सहन करावा लागत आहे. कडक उन्हाच्या दिवसात कुलर, पंखे असूनही ते केवळ शोभेच्या वस्तू म्हणून राहिले आहेत.
वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून ही समस्या, अशी मागणी पंढरीनाथ चौधरी, प्रविण फुके, लक्ष्मणराव तारो, कोलते, झुंबड, शिंगणे, बुलबुले, विष्णू काळे आदींसह घायाळनगरवासियांनी एका निवेदनाद्वार केली आहे.