नागरिकांचा जागता पहारा

By Admin | Updated: June 30, 2014 00:39 IST2014-06-30T00:31:33+5:302014-06-30T00:39:45+5:30

राजूर : गेल्या दीड महिन्यात चोरट्यांनी राजूरसह परिसरातील नागरिकांची झोप उडवली आहे.

Citizen awareness | नागरिकांचा जागता पहारा

नागरिकांचा जागता पहारा

राजूर : गेल्या दीड महिन्यात चोरट्यांनी राजूरसह परिसरातील नागरिकांची झोप उडवली आहे. कायम चोऱ्यांच्या घटना घडत असल्याने पोलिसांबरोबरच आता नागरिकांनीही रात्रभर जागता पहारा ठेवण्यास सुरूवात केली आहे. मात्र चोरट्यांकडून गावकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे अद्याप एकाही चोरीचा तपास लावण्यात हसनाबाद पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या दीड महिन्यात राजुरातून चारचाकी, दुचाकी वाहने चोरट्यांनी लंपास केली. त्यातच गेल्या शनिवारी चोरट्यांनी राजूर येथील दिनकर पुंगळे व चणेगाव शिवारातील बिटले यांच्या घरात घुसून मारहाण करून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला. त्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. त्यानंतर किरकोळ चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याने राजूरसह परिसरातील गावातील नागरिक हवालदिल झाले आहेत. राजूर, तपोवन, चांधई एक्को, खामखेडा, चांधई ठोंबरी येथील बहुतांशी नागरिक वस्त्यावर राहतात. वस्तीवरील नागरिकांनी समुहाने रात्रीची गस्त सुरु केली आहे.
राजुरात सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे कर्मचाऱ्यांसह युवकांना सोबत घेऊन रात्रीची गस्त घालीत आहेत. मात्र चोऱ्यांच्या अफवा सुटतच असल्याने जनता भयभीत झाली आहे. गावागावातील काही टवाळखोर दुसऱ्यांच्या घरावर दगडे मारून चोरटे आल्याची अफवा पसरवण्याचे काम करीत आहेत. पोलिसांनी चोरट्यांसह अफवा पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. (वार्ताहर)
अफवांचे पेव फुटले..
राजूर परिसरात काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. अशातच चोरटे आले, पळा.., घरावर दगडफेक करण्याचे प्रकार वाढले आहेत. चोरट्यांसोबतच काही टवाळखोरांची दहशत ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.
राजूरसह परिसरात पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. राजूर परिसरातील तीस ते चाळीस गावांचे केंद्रबिंदू असल्याने मोठ व्यापारीपेठ आहे. या दृष्टीने हे बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Citizen awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.