३३१ जणांच्या सदस्यत्वावर गंडांतर !
By Admin | Updated: October 29, 2014 00:44 IST2014-10-29T00:36:06+5:302014-10-29T00:44:51+5:30
उस्मानाबाद : शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा नियमितपणे वापर करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते

३३१ जणांच्या सदस्यत्वावर गंडांतर !
उस्मानाबाद : शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा नियमितपणे वापर करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते. असे असतानाही जिल्हाभरातील सुमारे ३३१ सदस्यांनी शौचालय बांधून वापर केला जात नसल्याचा प्रकार चौकशीतून समोर आला. त्यानंतर याबाबतीत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी झाली. सुनावनीअंती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील सुमारे ३३१ सदस्यांना अपात्र घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे गावपुढाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हाभरातील शौचालय नसलेल्या गावपुढाऱ्यांना ते बांधून घेण्यासाठी वारंवार मुदत देण्यात आली. मात्र अनेक पुढाऱ्यांनी ‘आपले कोण काय करणार’ या अविर्भावात राहून शौचालय बांधण्याकडे कानाडोळा केला. या संदर्भात जिल्हा परिषदेकडून सर्व संबंधितांना वारंवार नोटीसाही देण्यात आल्या. कारवाईची भितीही दाखविण्यात आली. मात्र याचा संबंधितावर काहीच उपयोग झाला नाही. अखेर जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अशा एक हजारावर सदस्यांना अपात्र करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. २०१२ मध्ये दाखल केलेल्या या प्रस्तावावर प्रशासनाकडून वारंवार सुनावण्या घेण्यात आल्या. सुनावणी दरम्यान अनेकांनी शौचालय बांधून वापर करण्याबाबतचे लेखी दिले. त्यानुसार काही जणांनी शौचालय बांधूनही घेतली. मात्र प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या मुदतीतही अनेकांनी शौचालय बांधलेच नाहीत. यापैकी सध्या अनेकजण सदरील पदावरुन पायउतार झाले आहेत. काहीजण दगावले आहेत. त्यामुळे प्रशासनाने जे सदस्य पदावर कार्यरत आहेत त्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले नाही, अशा ग्रामपंचायत पुढाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. अपात्रतेची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये सर्वाधिक १२४ सदस्य हे एकट्या परंडा तालुक्यातील आहेत.
त्यानंतर भूम तालुक्यातील ५४, उस्मानाबाद तालुक्यातील २४, तुळजापूर तालुक्यातील २१, कळंब तालुक्यातील ३७, लोहारा तालुक्यातील २५ आणि वाशी तालुक्यातील ९ सदस्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांचा एकूण संख्येचा विचार केला असता, अपात्रतेची कारवाई करण्यात आलेल्या गावपुढाऱ्यांची संख्या ३३१ इतकी झाली आहे. प्रशासनाने उचललेल्या या कठोर पावलामुळे गावपुढाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. यातील अनेक सदस्यांचा ८ ते १२ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे हे सदस्य आता कुठली भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)