विविध प्रमाणपत्रे मिळणार सर्कलमध्येच
By Admin | Updated: December 29, 2014 00:55 IST2014-12-29T00:44:45+5:302014-12-29T00:55:53+5:30
जालना : सरकारी पातळीवर विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळविताना सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: दमछाक होते.

विविध प्रमाणपत्रे मिळणार सर्कलमध्येच
जालना : सरकारी पातळीवर विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळविताना सर्वसामान्य नागरिकांना अक्षरश: दमछाक होते. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन किंवा महासेतू केंद्र गाठून प्रमाणपत्रांसाठी ताटकळत बसावे लागते. परंतु जिल्हा प्रशासनाने आता प्रत्येक बुधवारी किमान दोन सर्कलमध्ये अशा प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे ठरविले आहे.
जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जाते. जात प्रमाणपत्र, रहिवासी, इन्कमटॅक्स, सातबारा, जन्म-मृत्यू इत्यादी प्रकारचे प्रमाणपत्र वेळेवर मिळणे गरजेच असते.
त्यासाठी ग्रामस्थांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. ग्रामस्थांना आता आपल्या गावात, गावाजवळच प्रमाणपत्र मिळणार आहे.
त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना यासंबंधीच्या सूचना केल्या. काही प्रमाणपत्र वितरणाच्या ठिकारी जिल्हाधिकारी नायक हे स्वत: उपस्थित राहणार आहेत.
विविध प्रकारची प्रमाणपत्रे महासेतू, तहसील कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालय असा प्रवास केल्यानंतरच मिळतात. जालन्याच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा यांनी गेल्या महिन्यात लाभार्थ्यांना एकाच दिवशी कार्यालयात बोलावून जात प्रमाणत्रांचे वितरण केले होते. अशाच प्रकारे प्रमाणपत्रांचे वाटप होणार आहे. (प्रतिनिधी)