सर्कलमधील पुढाऱ्यांची प्रतिष्ठा लागली पणाला

By Admin | Updated: October 9, 2014 00:37 IST2014-10-09T00:33:53+5:302014-10-09T00:37:30+5:30

भूम : शहरासह तालुक्यातील ईट, पाथरुड, माणकेश्वर, वालवड, अंबी या मोठा गावातून मतदान खेचण्यासाठी सर्वच पक्षाकडून स्पर्धा सुरू झाली आहे.

Circle leaders are respected | सर्कलमधील पुढाऱ्यांची प्रतिष्ठा लागली पणाला

सर्कलमधील पुढाऱ्यांची प्रतिष्ठा लागली पणाला


भूम : शहरासह तालुक्यातील ईट, पाथरुड, माणकेश्वर, वालवड, अंबी या मोठा गावातून मतदान खेचण्यासाठी सर्वच पक्षाकडून स्पर्धा सुरू झाली आहे. किंबहुना यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर असल्याने या सर्कलमधील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तालुक्यात ईट सर्कलमध्ये जि. प. सदस्य राजाभाऊ हुंबे व पं. स. सदस्य शिवाजी जालन हे राष्ट्रवादीचे असल्याने सत्तेमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा असला तरी काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब देशमुख यांचाही मतांचा मोठा जनाधार असल्याने त्यांच्या ईटमध्ये मताधिक्य घेण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. ईटमध्ये शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख काकासाहेब चव्हाण यांच्याकडे ग्रामपंचायत असल्याने येथील ६ हजारावर मतदानाचा कल कोणाला मिळतो, याची उत्सुकता लागून आहे. माणकेश्वर गावातून ३ हजार ८६५ मतदार संख्या आहे.यात पुरुष २०८८ तर महिला मतदारांची १७७७ एवढी संख्या आहे. या सर्कलच्या जि. प. सदस्या राष्ट्रवादीच्या मीना सूळ तर पं. स. च्या सदस्या सुनिता पालके व पं. स. सदस्या काकडे या राष्ट्रवादीच्या आहेत. या सर्कलची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने आ. राहुल मोटे यांची मते घेण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे रासपकडून निवडणूक लढवित असलेले बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांना मानणारा वर्गही असल्याने मतदान मिळविण्यासाठी मोठी चुरस आहे.
भूम तालुक्यातील पाथरूड या ३२२७ मतदारांच्या गावात १७५० पुरुष व १४७७ महिला मतदार आहेत. राकाँचे उपसभापती रामकिसन गव्हाणे यांचा हा बालेकिल्ला असल्याने या भागाचे जि. प. सदस्य सुनील भोईटे हेही जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र सेनेला व बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनाही मानणारा गट येथे असल्याने येथून मतदान खेचण्यासाठी स्पर्धा आहे. शिवाय पाथरूड ग्रामपंचायत काँग्रेसच्या प्रा. तानाजी बोराडे यांच्याकडे असल्याने अ‍ॅड. नुरोद्दीन चौधरी यांनीही या संघातून मते मिळविण्यासाठी चुरस वाढविली आहे.
वालवड येथे २२७६ इतके मतदान आहे. १२१४ पुरुष तर १०६२ महिला मतदार आहेत. येथे नवनिर्वाचित जि. प. बांधकाम सभापती दत्ता मोहिते यांनी सेनेसाठी तगडी फिल्डींग लावली आहे. तर वालवड ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे असल्याने सरपंच सुनील पाटील यांच्यासह प्रवीण खटाळ, अजित इंदलकर, लता विभुते ह्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ असल्याने मते मिळविण्यासाठी चुरस वाढविली आहे. भूम तालुक्यातील अंबी हेही मोठे गाव असून, सभापती अण्णा भोगील यांचा बालेकिल्ला आहे. २२२७ मतदार असलेल्या गावातून १२४६ पुरुष तर ९८१ महिला मतदार आहेत. येथे काँग्रेसच्या स्रेहप्रभा पाटील यांचाही दबदबा असून भाजपाचे अंगद मुरूमकर हेही बाळासाहेब पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी कितपत यशस्वी ठरतात, हे पाहावे लागणार आहे. प्रमुख पक्षांसह दहा उमेदवार या मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत. (वार्ताहर)

Web Title: Circle leaders are respected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.