कोथिंबीरचा दर २०० रुपये किलोवर
By Admin | Updated: July 13, 2014 00:25 IST2014-07-13T00:12:20+5:302014-07-13T00:25:00+5:30
नांदेड : जुलैचा अर्धा महिना संपत आला तरी अद्याप पाऊस झाला नसल्याचा परिणाम भाजीबाजारावर जाणवू लागला असून कोथिंबीरचे दर तब्बल २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत.
कोथिंबीरचा दर २०० रुपये किलोवर
नांदेड : जुलैचा अर्धा महिना संपत आला तरी अद्याप पाऊस झाला नसल्याचा परिणाम भाजीबाजारावर जाणवू लागला असून कोथिंबीरचे दर तब्बल २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. यामुळे गृहिणीचे मात्र महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
नांदेड शहरातील विविध भाजी बाजारात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे. मृग नक्षत्र सुरु होऊन सव्वा महिन्याचा कालावधी होत असताना पाऊस झाला नाही, याचा परिणाम भूगर्भातील पाणीपातळीत घट होत असल्याने उत्पन्न कमी होऊन बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. मागणी जास्त आणि आवक कमी यामुळे भाजीपाल्यांसह पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या असलेले भाजीपाल्याचे दर असे- कोथिंबीर २०० रु. किलो, बटाटे ४० रु.किलो, टोमॅटो ४० रु.किलो, हिरवी मिरची ८० रु.किलो, वांगी ६० रु.किलो, भेंडी ६० रु. शेवगा ६० रु.किलो, पालक १० रु. पाव, चुका १० रु.पाव, कोबी ८० रु.किलो याप्रमाणे दर आहेत.
एप्रिल- मे महिन्यात बाजारात भाजीपाल्याची आवक जास्त असल्याने दरही आटोक्यात होते. मे मध्ये तर टोमॅटोचे दर २ रुपये किलोवर ेयेवून ठेपले होते, शेतकऱ्यांना तोडणी करुन विक्रीसाठी आणण्याचा खर्चही निघत नव्हता. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी बंद करुन टोमॅटोच्या शेतीची नांगरटी करुन टाकली होती. मात्र आजघडीला टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने ६०० ते ७०० रुपये कॅरेट (प्रति २० किलो) याप्रमाणे दर मिळत आहेत.
उपलब्ध पाणीसाठा कमी झाल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली नाही. याचा परिणाम होवून सर्वच भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. (प्रतिनिधी)