अवैध बांधकाम करणाऱ्यांना पाचजणांना सिडकोच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:18 IST2019-04-02T23:18:48+5:302019-04-02T23:18:57+5:30
सिडको अधिसूचित क्षेत्रात परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

अवैध बांधकाम करणाऱ्यांना पाचजणांना सिडकोच्या नोटिसा
वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रात परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. १ एप्रिलपासून अशा बांधकामधारकांना सिडकोने नोटिसा बजावली आहे. वडगाव कोल्हाटी हद्दीतील गट नंबर १३ व १०/१ मधील ५जणांना नोटिसा दिल्या आहेत.
वाळूज महानगरातील वडगाव कोल्हाटी, शेकापूर, तीसगाव, वाळूज, गोलवाडी आदी परिसरात सिडको अधिसूचित क्षेत्रात खाजगी जमिनीवर अनेकांनी भूखंड व घरे विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारी व पदाधिकारी यांच्याशी हातमिळवणी करत लेआऊट पाडून विकासकांनी सिडकोची परवानगी न घेता नियमबाह्यपणे प्लॉट व घरांची विक्री करण्यात आली आहे. मात्र सिडको प्रशासनाने अवैध बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडका सुरु केला आहे. सिडकोने आत्तापर्यंत ४० पेक्षा अधिक विकासकांवर वाळूज, वाळूज एमआयडीसी व सातारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. आता पुन्हा १ एप्रिलपासून प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर १३ मधील संतोष चंदन, निलेश साळुंके व इतरांना व गट नंबर १०/१ मधील श्री साई डेव्हलपर्स अॅण्ड प्लॉटिंगचे नामदेव कांदे, कृष्णा साळुंके, आणि नासीर शाह यांना सोमवारी अनधिकृत बांधकाम व रेखांकन केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या असल्याची माहिती सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांनी दिली.
नोटिसा बजावून कारवाईचा इशारा
सिडको प्रशासनाने नोटिसाद्वारे संबंधितांनी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम १९६६ चे कलम ५३ (१) अन्वये ३२ दिवसांत बांधकाम निष्कासित करुन सदरील जागा पूर्वस्थितीत ठेवणे बंधनकारक आहे. अन्यथा प्रशासन कलम ५३ (६) (ब) नियमानुसार संबंधितांवर कारवाई करेल, असा इशारा नोटिसाद्वारे देण्यात आला आहे.