सिडको वाळूज महानगरातील रस्त्यांची चाळणी

By | Updated: December 4, 2020 04:07 IST2020-12-04T04:07:32+5:302020-12-04T04:07:32+5:30

शेख मेहमूद वाळूजमहानगर : सिडको वाळूज महानगरातील मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली असून या रस्त्यावर ये-जा करताना वाहनधारक व ...

CIDCO Waluj Metro Road Sieve | सिडको वाळूज महानगरातील रस्त्यांची चाळणी

सिडको वाळूज महानगरातील रस्त्यांची चाळणी

शेख मेहमूद

वाळूजमहानगर : सिडको वाळूज महानगरातील मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली असून या रस्त्यावर ये-जा करताना वाहनधारक व नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहे. सर्व्हीस रोडचे काम रखडल्यामुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरुन ये-जा करावी लागत आहे.

यंदा परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील विजय स्टील ते पाईपलाईन रोड, सिडको ग्रोथसेंटर, लक्ष्मीनगर परिसर, तिसगाव चौफुली ते वडगाव, सिध्दीविनायक विहार ते ए. एस. क्लब, सूृर्यवंशीनगर ते मुंबई हायवे आदी मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारक व नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. या खड्ड्यांमुळे दळणवळण यंत्रणा विस्कळीत होत असून नागरिक व वाहनधारकांना दूरचा फेरा मारुन ये-जा करावी लागत आहे. या परिसरातील डीपी रोडवरील खड्डे बुजवून डांबरीकरण करावे, यासाठी सिडको कृती समितीच्या वतीने सिडको प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे. मात्र, रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याऐवजी प्रशासन मुरुम टाकून खड्डे बुजवित असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे. वाहनांच्या सतत वर्दळीमुळे धूळ उडत असून दुचाकीस्वार व नागरिक धुळीने माखून जात आहेत.

सर्व्हीस रोडचे कामही रखडले

सिडको प्रशासनाच्या वतीने गत चार-पाच वर्षांपूर्वी ए. एस. क्लबपासून वाळूजपर्यंत सर्व्हीस रोडचे काम हाती घेतले होते. या सर्व्हीस रोडसाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून रोडचे काम सुरु केले होते. मात्र, अनेक अतिक्रमणधारकांनी न्यायलयात धाव घेतल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. परिणामी नागरिकांना जीव धोक्यात घालून औरंगाबाद-नगर महामार्गावरुन ये-जा करावी लागत आहे. सर्व्हीस रोडसाठी सिडकोने खर्च केलेला निधीही पाण्यात गेल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

रस्तेदुरुस्तीचा प्रस्ताव सादर

या परिसरातील रस्त्याच्या दुरवस्थेविषयी प्रशासनाकडे तक्रारी आल्या आहेत. या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच रस्ताची दुरुस्ती करण्याात येणार आहे.

प्रगती चोंडेकर, प्रशासक

प्रतिक्रिया..

खड्ड्यांमुळे अपघात वाढले

सिडको वाळूजमहानगरातील रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे या भागात अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करताना जीवघेणी कसरत करावी लागते. वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

- नारायण पवार, त्रस्त नागरिक

सेवाकर कर भरुनही सुविधा मिळेना

या परिसरात किमान मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडको प्रशासनाची आहे. सुविधाच्या मोबदल्यात सिडको प्रशासन नागरिकांकडून सेवाकरही वसूल करीत आहे. मात्र, सुविधा पुरविण्यास टोलवाटोलवी केली जात असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व्हीस रोडचे रखडलेले काम सिडकोने पूर्ण करणे गरजेचे आहे.

- चंद्रकांत चोरडिया, त्रस्त नागरिक

फोटो ओळ- सिडको वाळूजमहानगरात रस्त्याची झालेली दुरवस्था.

-----------------------------

Web Title: CIDCO Waluj Metro Road Sieve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.