औरंगाबाद : मनपाच्या कचरा वाहतूक करणाऱ्या हायवाने भाजीपाला विक्रेता दाम्पत्याला चिरडले. ही घटना आज सोमवारी सकाळी सिडको परिसरातील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ घडली. यात पती पत्नीचा मृत्यू झाला. प्रकाश सूर्यभान जाधव (३३) व मोनिका प्रकाश जाधव (२८, रा. शहानूरवाडी) असे मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहानूरवाडी येथील प्रकाश सूर्यभान जाधव हे आपल्या पत्नीसोबत भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी सकाळी जाधववाडी मार्केटमधून हे दाम्पत्य दुचाकीवरून भाजीपाला घेऊन घराकडे निघाले होते. तेव्हा कचरा वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात प्रकाश सूर्यभान जाधव (३३) व मोनिका प्रकाश जाधव (२८, रा. शहानूरवाडी) हे पती-पत्नी जागीच ठार झाले. सिडको पोलिसांनी हायवा व चालकास ताब्यात घेतले आहे.