गणोरीत रंगणार तीन पॅनेलमध्ये चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST2021-01-08T04:11:27+5:302021-01-08T04:11:27+5:30
गणोरी ग्रामपंचायत ही फुलंब्री तालुक्यातील अंत्यत महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. याठिकाणी पाच वार्ड असून, १५ सदस्य संख्या आहे. गावात राजकीय ...

गणोरीत रंगणार तीन पॅनेलमध्ये चुरस
गणोरी ग्रामपंचायत ही फुलंब्री तालुक्यातील अंत्यत महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. याठिकाणी पाच वार्ड असून, १५ सदस्य संख्या आहे. गावात राजकीय नेते, कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्याने या गाव पातळीवरील निवडणुकीत तब्बल तीन पॅनेल तयार झाले असून, ७ उमेदवार अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत. निवडणुकीच्या आखाड्यात एकूण ५२ उमेदवार उभे राहिल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. विद्यमान उमेदवार आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा मतदारांना हवाला देत आहे. याशिवाय नवीन पॅनेलमधील उमेदवार आगामी काळात गावात काय कामे करणार याबाबत सांगत असल्याचे चित्र आहे. तिन्ही पॅनेलच्या प्रचारचा नारळ फुटला असून, प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे.
------------------------------------------------------------------------------
पावणेपाच हजार मतदार
गणोरी ग्रामपंचायतीच्या आखाड्यातून १५ सदस्यांची निवड होणार असून, चार हजार ८०८ मतदार आपला हक्क बजावणार आहे. यात पुरुष मतदारांची संख्या २ हजार ५७१, तर २ हजार २३७ महिला मतदारांचा समावेश आहे. एकूण ५२ उमेदवार रिंगणात असून, सर्वांत कमी वयाची उमेदवार म्हणून अनिता संदीप पेहरकर, तर सर्वाधिक वयाचे उमेदवार म्हणून आसाराम बाजीराव तांदळे यांचा उल्लेख करता येईल.
-------------------------------------------------------------------------------------
बॅनरवर राज्य, राष्ट्रीय नेत्यांचे फोटो
या निवडणुकीत तीन पॅनेलमधील पहिल्या पॅनेलच्या बॅनरवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच प्रहार संघटनेच्या प्रमुख नेत्यांचे फोटो दिसून येत आहेत, तर दुसऱ्या पॅनेलच्या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो आहेत. तिसऱ्या पॅनेलच्या बॅनरवर कोणत्याही नेत्याचा फोटो नाही हे विशेष.
--- कॅप्शन : गणोरी ग्रामपंचायत