प्रभू येशूच्या जयघोषात नाताळ साजरा
By Admin | Updated: December 26, 2014 00:15 IST2014-12-25T23:59:40+5:302014-12-26T00:15:05+5:30
औरंगाबाद : उत्साहपूर्ण वातावरणात आज शहरात प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस नाताळ साजरा करण्यात आला.

प्रभू येशूच्या जयघोषात नाताळ साजरा
औरंगाबाद : मेरी ख्रिसमस म्हणत एकमेकांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा, प्रभू येशू ख्रिस्तांच्या नावाचा जयघोष, गर्दीमुळे चर्च परिसराला आलेले जत्रेचे स्वरूप, पिपाण्यांचा आवाज, अशा उत्साहपूर्ण वातावरणात आज शहरात प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस नाताळ साजरा करण्यात आला. छावणीसह शहरातील सर्वच चर्चमध्ये बुधवारी मध्यरात्रीपासून खिस्त जन्माच्या उत्सवाला सुरुवात झाली होती. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला केक कापून येशू ख्रिस्तांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यात आला.
छावणीतील सर्वात मोठ्या क्राईस्ट चर्चला तर जत्रेचे स्वरूप आले होते. चर्च परिसरात दिवसभर ख्रिस्ती बांधवांची गर्दी उसळली होती. लहान मुलांसाठी येथे मोठ्या प्रमाणावर खेळण्यांची दुकाने लावण्यात आली होती. क्राईस्ट चर्चमध्ये बुधवारी रात्री १२ वाजता प्रार्थना झाली. रेव्हरंड डॉ. सी. एन. आठवले यांनी याप्रसंगी उपस्थितांना नाताळचा संदेश दिला. यावेळी चर्चचे प्रमुख सुशील घुले, रेव्हरंड प्रकाश नाडे, रेव्ह. विपुल बत्तीसे यांनी धार्मिक विधी पार पाडण्यास सहकार्य केले.
प्रार्थनेनंतर केक कापून ख्रिस्त जन्माचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी १०.३० वाजता नाताळनिमित्त विशेष प्रार्थना झाली. यामध्ये हजारो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले. याप्रसंगी चर्चच्या गायकवृंदांनी धार्मिक गीते सादर केली. त्यानंतर उपस्थितांकडून धान्य, फळे आणि इतर विविध प्रकारच्या भेट वस्तू चर्चला अर्पण करण्यात आल्या. यावेळी चर्चमध्ये आणि चर्चच्या परिसरात उपस्थितांकडून एकमेकांना मेरी ख्रिसमस म्हणून नाताळच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. लहान मुले, तरुण, वयोवृद्ध अशा सर्वच वयोगटातील स्त्री- पुरुषांनी नाताळनिमित्त चर्चमध्ये गर्दी केली होती. छावणीतील बिशप चर्च तसेच एन-७ येथील चर्च आणि शहरातील इतर चर्चमध्ये सकाळी नाताळची विशेष प्रार्थना पार पडली.