चौक्या ओस... चौकीदारी बंद!
By Admin | Updated: July 17, 2014 01:36 IST2014-07-17T01:30:45+5:302014-07-17T01:36:16+5:30
विनोद काकडे , औरंगाबाद गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आणि नागरिकांना तातडीने पोलीस मदत मिळावी, यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत दोन ते तीन पोलीस चौक्या बनविण्यात आल्या आहेत

चौक्या ओस... चौकीदारी बंद!
विनोद काकडे , औरंगाबाद
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आणि नागरिकांना तातडीने पोलीस मदत मिळावी, यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत दोन ते तीन पोलीस चौक्या बनविण्यात आल्या आहेत; परंतु शहरातील बहुतांश चौक्या आजघडीला केवळ शोभेची वस्तू बनल्या आहेत. पोलीस कित्येक दिवस या चौक्यांकडे फिरकतच नसल्याचे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. चौक्या ओस अन् चौकीदारी बंद असल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावत आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये औरंगाबाद शहराची लोकसंख्या आणि विस्तार मोठ्या झपाट्याने झाला. त्याचबरोबर गुन्हेगारीही वाढत गेली. मात्र, त्या तुलनेत पोलीस कर्मचारी आणि पोलीस ठाण्यांची संख्या काही वाढली नाही.
शहराच्या विस्तारामुळे पोलीस ठाण्यांची हद्द वाढलेली आहे. पोलीस ठाण्यातून हद्दीत सर्वत्र लक्ष ठेवणे अशक्य बनलेले आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर नागरिकांना वेळीच पोलीस मदत मिळावी, गुन्हेगारांवर लक्ष्य ठेवणे शक्य व्हावे, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन किंवा तीन पोलीस चौक्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. चौकीत नेमलेल्या पोलिसांनी आपल्या चौकीच्या हद्दीत गुन्हेगारीवर वचक ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, या चौक्या उभारण्याचा हा उद्देश सफल होताना दिसून येत नाही.
चौक्यांना टाळे
‘लोकमत’ने शहरातील पोलीस चौक्यांची पाहणी केली. तेव्हा शहरातील बहुतांश पोलीस चौक्यांना टाळे आढळून आले. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन भागात वाढलेल्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून काही महिन्यांपूर्वी स्टेशनच्या बाजूलाच चौकी उभारण्यात आली होती. चौकी सुरू झाल्यानंतर एका महिन्याच्या आत ती बंद पडली. गेल्या अनेक महिन्यांपासून या चौकीचे टाळेही उघडण्यात आलेले नाही, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे स्टेशनजवळील चौकीच्या मागेच अवैध दारू, गांजा विक्री सुरू आहे, तसेच जुगाराचे अड्डे सुरू असल्याचे दिसून आले.
पुंडलिकनगर चौकीचीही अशीच अवस्था आहे. गजानन मंदिर रोडवरील वाहेगुरू कॉम्प्लेक्समध्ये असलेली ही चौकी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेली आहे. पोलीस इकडे फिरकतच नाहीत. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवशंकर कॉलनीत असलेल्या पोलीस चौकीलाही कित्येक महिन्यांपासून टाळे आहे. या हद्दीतील शिवाजीनगर पोलीस चौकीतही पोलीस कधी तरी येतात, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
उस्मानपुरा ठाण्याच्या हद्दीत असलेली तारा पान सेंटरजवळची चौकी काही महिन्यांपूर्वी दुरुस्तीसाठी पाडण्यात आली होती. कित्येक महिने उलटले. तेथे परत पोलीस चौकी सुरू करण्यात आलेली नाही.
जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली संजयनगर पोलीस चौकीही ओस पडलेली दिसून आली. कधी तरी पोलीस इकडे येतात, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. याच हद्दीतील बायजीपुरा चौकीलाही टाळे दिसून आले.
येथेही आठवड्यातून कधी तरी पोलीस येतात, असे आसपासच्या नागरिकांनी सांगितले. सिटीचौक ठाण्याच्या हद्दीत मौलाना आझाद महाविद्यालयाजवळ असलेल्या पोलीस चौकीलाही टाळेच दिसून आले. शिवाय सिडकोच्या हद्दीतील जाधववाडी नव्या मोंढ्यातील चौकातही कधी तरी पोलीस येतात, असे पसिरातील व्यापाऱ्यांनी सांगितले. याशिवाय बेगमपुऱ्याच्या हद्दीतील थत्ते हौद परिसरातील चौकीलाही गेल्या अनेक दिवसांपासून टाळे लागलेले दिसून आले. शहरातील इतर पोलीस चौक्यांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नव्हती. कोठे कित्येक महिन्यांपासून पोलिसांनी चौकीचे टाळेच उघडलेले नाही तर कोठे कधी तरी पोलीस चौकीत येऊन बसत असल्याचे आसपासच्या नागरिकांनी सांगितले.
पोलीस प्रशासनालाच माहीत नाही संख्या
1औरंगाबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत किती पोलीस चौक्या आहेत, याची आकडेवारी जाणून घेण्यासाठी सदर प्रतिनिधीने पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधला असता आमच्याकडे निश्चित आकडा नाही, असे उत्तर मिळाले.
2शहरातील पोलीस यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या नियंत्रण कक्षालाच आपल्या हद्दीतील चौक्यांची संख्या आणि त्या कोठे-कोठे आहेत याची माहिती नाही, ही आश्चर्याचीच बाब म्हणावी लागेल. याशिवाय आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही चौकींच्या संख्येबाबत विचारणा केली असता एकाही अधिकाऱ्याला आकडा माहीत नसल्याचे आढळून आले.
3यासंदर्भात पोलीस उपायुक्त (प्रशासन) जय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ‘मी बंदोबस्तात आहे. परवा याबाबत सांगतो,’ असे ते म्हणाले.
गुन्हेगारांचे फावतेय
1चौक्या सुरू असल्या आणि तेथे पोलीस तैनात असले तर गुन्हेगारांमध्ये एक वचक राहतो. शिवाय परिसरातील नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण होते. मात्र, शहरातील बहुतांश चौक्या बंद असल्यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावत आहे.
चौक्या सुरू करण्यासाठी अनेक अर्ज
1आमच्या भागात पोलीस चौकी सुरू करा, असे अनेक अर्ज शहरातील पोलीस ठाण्यात धूळखात पडलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले. जागा आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे आहे त्याच चौक्या नीट चालविणे अवघड बनले आहे, अशा स्थितीत नवीन चौक्या सुरू करणे कसे शक्य आहे, असा प्रश्न एका पोलीस अधिकाऱ्याने उपस्थित केला.
2कारण पोलीस ठाण्यांच्या हद्दी मोठ्या असल्याने ठाण्यापासून पोलिसांना घटनास्थळापर्यंत पोहोचायला वेळ लागतोय. तोपर्यंत गुन्हेगारांना पळून जाण्यास वेळ मिळतोय.