रेल्वेखाली आलेला चिमुकला बचावला

By Admin | Updated: July 9, 2017 00:41 IST2017-07-09T00:35:32+5:302017-07-09T00:41:42+5:30

औरंगाबाद : ‘देव तारी त्याला कोण मारी...’ या म्हणीची प्रचीती आणणारी घटना शनिवारी (दि. ८) औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहायला मिळाली,

Chimukas under the train escaped | रेल्वेखाली आलेला चिमुकला बचावला

रेल्वेखाली आलेला चिमुकला बचावला

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘देव तारी त्याला कोण मारी...’ या म्हणीची प्रचीती आणणारी घटना शनिवारी (दि. ८) औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहायला मिळाली, जेव्हा एक चिमुरडा रेल्वेखाली आला. रेल्वेखाली येऊनही चिमुरड्याचा जीव वाचल्याने कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास टाकला. दैव बलवत्तर होते म्हणून चिमुकल्याला काहीच झाले नाही; पण प्रत्यक्षदर्शी सर्वांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला होता. रेल्वेस्टेशनवरील सीसीटीव्ही कॅ मेऱ्यात ही थरारक घटना कैद झाली आहे.
रेल्वेस्टेशनवर शनिवारी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून मनमाड-काचीगुडा पॅसेंजर रवाना होताना ही घटना घडली. एक लहान मुलगा आणि मुलीसह आलेल्या दाम्पत्याने धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. पुरुषाने आधी मुलीला उचलून धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात बसविले. त्यानंतर मुलाला बसविले. दोन्ही मुले आतमध्ये जात नाही, तोच महिलेने रेल्वेत चढण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत रेल्वेचा वेग वाढला होता. त्यामुळे तोल जाऊन ती प्लॅटफॉर्मवर पडली. ही महिला प्लॅटफॉर्मवर पडत नाही, तोच दरवाज्यातून चिमुकलाही बाहेर फेकला गेला व प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मध्ये सापडला.
हे भीषण दृश्य पाहून एकाच वेळी अनेकांच्या तोंडातून किंकाळ्या निघाल्या. या दुर्घटनेत मुलगा वाचेल, असे कुणालाही वाटले नसणार. रेल्वेस्टेशनवर एकच गोंधळ उडाला. अनेकांनी बोगीखाली सापडलेल्या चिमुकल्याकडे धाव घेतली; परंतु नशीब बलवत्तर म्हणून हा चिमुकला बालंबाल बचावला.
प्रवाशांची सतर्कता
गाडीच्या बाहेर फेकल्या गेलेल्या चिमुकल्यास एका प्रवाशाने घट्ट पकडून ठेवल्याने रेल्वेखाली येण्यापासून तो वाचला. प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने रेल्वे तात्काळ थांबविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
चिमुकला बचावल्याने कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला. घटनेनंतर ते पुढील प्रवासाला रवाना झाले. प्रवाशांनी धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वेस्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे यांनी केले.

Web Title: Chimukas under the train escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.