बालिकेचा अपहरणाचा प्रयत्न?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:14 IST2017-08-11T00:14:10+5:302017-08-11T00:14:10+5:30
जळगाव रोडवरील एसबीओए शाळेच्या आवारातून साडेतीनवर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न सतर्क रिक्षाचालकामुळे फसला. हा प्रकार लक्षात आल्याने पालक आणि रिक्षाचालकाने आरडाओरड करून आरोपीला पकडले

बालिकेचा अपहरणाचा प्रयत्न?
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जळगाव रोडवरील एसबीओए शाळेच्या आवारातून साडेतीनवर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न सतर्क रिक्षाचालकामुळे फसला. हा प्रकार लक्षात आल्याने पालक आणि रिक्षाचालकाने आरडाओरड करून आरोपीला पकडले. गस्तीवरील हर्सूल ठाण्याच्या चार्ली पोलिसांनी तात्काळ आरोपी तरुणाला ताब्यात घेऊन सिडको पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना सायंकाळी साडेचार ते पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली.
सिडको पोलिसांनी सांगितले की, जळगाव रोडवरील एसबीओए शाळेत सिडको एन-६ येथील एका बँक कर्मचाºयाची मुलगी बालवर्गात आहे. या बालिकेची शाळेत ने-आण करण्यासाठी त्यांनी रिक्षा लावली आहे. नेहमीप्रमाणे चिमुकलीस आणण्यासाठी रिक्षाचालक गुरुवारी शाळेच्या प्रवेशद्वारावर थांबला होता. यावेळी २२ ते २४ वर्षांचा तरुण तेथे अचानक आला आणि त्याने पाठीमागून चिमुकलीस उचलले. हे रिक्षाचालकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्याकडून चिमुकलीस अक्षरश: हिसकावून घेतले. ते त्याच्यावर जोरात ओरडल्याने अन्य पालक आणि रिक्षाचालकांच्या हा प्रकार लक्षात आला. चोहोबाजूंनी लोकांनी घेरल्याने त्यास पळून जाता आले नाही. लोकांनी पकडून त्यास चोप दिला. लोकांच्या आवाजाने तेथून जात असलेले गस्तीवरील हर्सूल ठाण्याचे हवालदार किरण काळे आणि कर्मचारी शाळेत गेले. त्यांनी आरोपीला लोकांच्या तावडीतून ताब्यात घेतले आणि सिडको ठाण्यात नेले. रिक्षाचालकाने चिमुकलीच्या पालकांना या घटनेची माहिती देत त्यांना सिडको ठाण्यात बोलावून घेतले.
तो तर मनोरुग्ण वाटतो...
सिडको ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती म्हणाले की, पोलिसांनी त्या तरुणाची झडती घेतली असता त्याच्या खिशात एक आधार कार्ड मिळाले. या आधार कार्डनुसार त्याचे नाव जितेंद्र आणि तो मध्य प्रदेशातील धार येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो मनोरुग्ण असल्याचे जाणवले. त्याला मात्र त्याचे नीट नाव आणि त्याचा पत्ता सांगता येत नाही. त्यास सोबत घेऊन पोलीस त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याची ही अवस्था पाहून बालिकेच्या पालकांनीही त्याच्याविरुद्ध तक्रार दिली नाही.