सचिनच्या ‘कोलाज’ची बच्चे कंपनीस भुरळ
By Admin | Updated: July 4, 2014 00:15 IST2014-07-03T23:42:33+5:302014-07-04T00:15:22+5:30
महेश पाळणे , लातूर क्रिकेट शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनलेला सचिन आता मैदानात दिसत नसला, तरी पुस्तकातील धड्याच्या रुपाने त्याची भुरळ चौथीच्या विद्यार्थ्यांना पडली आहे.

सचिनच्या ‘कोलाज’ची बच्चे कंपनीस भुरळ
महेश पाळणे , लातूर
अनेक विश्वविक्रम आपल्या नावे करून जगभरातील क्रिकेट शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनलेला सचिन आता मैदानात दिसत नसला, तरी पुस्तकातील धड्याच्या रुपाने त्याची भुरळ चौथीच्या विद्यार्थ्यांना पडली आहे. यंदा प्रथमच सचिनच्या विक्रमांची माहिती चौथीच्या अभ्यासक्रमात सचित्र प्रकाशित करण्यात आली आहे. मंगळवारी पुस्तके हाती पडताच विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने पहिल्यांदा सचिनचा धडा चाळला.
इयत्ता चौथीच्या मराठी बालभारती पुस्तकात सचिनचा ‘कोलाज’ या नावाने २० वा धडा ‘सचिन रमेश तेंडूलकर माझा आवडता क्रिकेटपटू’ या नावाने पान क्र. ७० वर प्रकाशित झाला आहे. प्रथमच एखाद्या क्रिकेटपटूवर धडा येण्याची ही पहिलीच वेळ आहे. चौथीच्या या नव्या अभ्यासक्रमात याचा समावेश करण्यात आला आहे.
यात सचिनच्या जन्मापासून पहिला कसोटी, एकदिवसीय तसेच शेवटचा कसोटी व एकदिवसीय सामना खेळलेली माहिती यासह कसोटी व एकदिवसीय सामन्यातील शतके, धावा, जागतिक विक्रम, सन्मान, निरोप समारंभातील भाषण, गुरु रमाकांत आचरेकर सरांशी सचिनचे मत व सचिनला मिळालेल्या ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाची माहिती सचित्रांसह झळकली आहे. सचिनचे खूप कौतुक वाटणाऱ्या एका छोट्या मुलीने त्याच्या क्रिकेटमधील विक्रमांची व इतर माहिती जमवून हा ‘कोलाज’ बनविला आहे. भविष्यातील बच्चे कंपनीस सचिनचा खेळ जरी आता पाहता येणार नसला, तरी या धड्याच्या माध्यमातून त्याचे कर्तृत्व झळकत राहणार आहे.
इयत्ता चौथीच्या बालभारती पुस्तकात एकूण २५ धडे आहेत. त्यात सचिनचा २० वा धडा असल्याने बच्चे कंपनीस गुरुजनांकडून शिकविण्यात येणाऱ्या या धड्यासाठी द्वितीय सत्राची वाट पहावी लागणार आहे.
हा धडा सचित्र व अनेक माहितींचा असल्याने उपयोगी आहे. सचिनचे फटके पहावयास मिळणार नसले तरी या धड्याच्या माध्यमातून त्याची आठवण राहील. - श्रद्धा जाधव, म़ बसवेश्वर वि़, लातूऱ
सचिनबद्दल तमाम भारतीयांंना अभिमान आहे. खरे तर सचिनचा या पुस्तकात पहिला धडा हवा होता. यामुळे आम्हाला वाट पहावी लागली नसती.
- वरद कुट्टे, म़ बसवेश्वर विद्यालय, लातूऱ
प्रेरणा देणारा खेळाडू म्हणून सचिन सर्वोत्कृष्ट आहे. सचिनच्या या धड्याने मराठी विषयात उत्सुकता निर्माण झाली आहे.
- संकेत भंडे, केशरबाई भार्गव प्रा़वि़, लातूऱ
भारताचा रत्न सचिनवर धडा निघाला, याचा सार्थ अभिमान आहे. द्वितीय सत्रात शिकविण्यात येणाऱ्या या धड्याची उत्सुकता आम्हा विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे.
- श्रीशैल्य वाडकर, के़ भार्गव वि़, लातूऱ
सचिनचा धडा चौथीच्या पुस्तकात आल्याने मन:स्वी आनंद होत आहे. शतकांच्या बादशहाचा हा धडा नक्कीच प्रेरणा देणारा आहे.
- स्वानंद सोमवंशी, म़ बसवेश्वर विद्यालय, लातूऱ
या धड्यातून सचिनविषयी पूर्ण माहिती मिळेल. सचिन एक महान खेळाडू असून, गुरुजनांकडून शिकविण्यात येणाऱ्या या धड्याची आम्ही अतूरतेने वाट पाहत आहोत.
-सचिन कराड, सरस्वती विद्यालय, लातूऱ
शतकांचे व धावांचे विक्रम करणारा सचिन जरी आता टीव्हीत दिसणार नसला, तरी त्याच्या या धड्याचा आदर्श आम्हा विद्यार्थ्यांना मिळेल.
- अभिषेक पांडे, सरस्वती विद्यालय, लातूऱ