शिशू कल्याण योजनेला घरघर
By Admin | Updated: September 4, 2014 00:20 IST2014-09-04T00:10:53+5:302014-09-04T00:20:32+5:30
गंगाधर तोगरे, कंधार सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी जननी शिशू सुरक्षा कल्याण योजना कार्यक्रम शासनाने राबविला.

शिशू कल्याण योजनेला घरघर
गंगाधर तोगरे, कंधार
सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी जननी शिशू सुरक्षा कल्याण योजना कार्यक्रम शासनाने राबविला. रुग्णांना वाहन सेवा व भोजन मोफत पुरविले जाते. परंतु योजनेला निधीअभावी घरघर लागली आहे. वाहनासाठीचा डिझेल खर्च तात्पुरता रुग्ण, नातेवाईकांना पदरमोड करावा लागत आहे. तर भोजन उधारीवर भागवावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मात्र पळता भूई होतानाचे चित्र आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत नागरिकांना विविध आरोग्य सेवा दिल्या जातात. नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी विविध प्र्रकारच्या सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचे आरोग्य योजनेतून भक्कम होत असल्याचे प्रकर्षाने पुढे आले आहे. केंद्र व राज्य शासनाने आरोग्य सुविधेत मोठी वाढ केली आहे. जोखिमेची प्रसूती सुरक्षित करण्यासाठी जननी शिशू सुरक्षा कल्याण योजना कार्यान्वित करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय व पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रसूतीसाठी महिलांना घेऊन जाणे व पुन्हा घरी आणून सोडणे मोफत सेवा दिली जाते. परंतु आता एक ते सव्वा महिन्यांपासून ग्रामीण रुग्णालयात निधी उपलब्ध नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातही अन्य बाबीतून डिझेल खर्च करण्याचा प्रसंग आला आहे.
शहरातील ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज पाचशे ते सहाशे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. तज्ञांचा अभाव व स्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाणवा हा सतत चिंतेचा विषय झाला आहे. अस्थायी, आयुष, मानद डॉक्टरावर रुग्णसेवेचा भार आहे. त्यातच जे. एस. एस. एस. के. ची भर पडली आहे. नातेवाईक, रुग्णांनी १०२ क्रमांकाला कॉल केल्यास तत्काळ वाहन पाठवले जाते. प्रसूतीसाठीची संदर्भ वाहन सेवा पुरविणे अनिवार्य आहे. मोफत वाहन सेवा असून सुखरुप प्रसूती होणे या सेवेत अभिप्रेत आहे.
रुग्णास ग्रामीण रुग्णालय नांदेडचे शासकीय रुग्णालय या ठिकाणी दाखल केले जाते. प्रवासासाठी ये-जा करणे वाहनसेवा मोफत आहे. परंतु एक ते सव्वा महिन्यांपासून निधी उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्ण, नातेवाईकांना डिझेल पुरविण्याचा, खर्च करण्याचा प्रसंग समोर आला आहे. जवळपास ४० जणांनी पदरमोड केल्याचे समजते. निधी आल्यानंतर रुग्णांचे पैसे परत केले जाणार असल्याचे ग्रामीण रुग्णालय सूत्रांनी सांगितले. त्यातच भोजन हे शहरातील एका उपाहारगृहातून उधारीवर घेतले जात आहे. रुग्ण-नातेवाईकांच्या शंकाचे निरसन करण्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांची पळता भूई थोडी होत असल्याचे चित्र आहे.
१०२ क्रमांकाप्रमाणेच बारुळ व कुरुळासाठी १०८ क्रमांक संदर्भसेवेचे वाहन उपलब्ध आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहनातून रुग्णास कंधार, नांदेड व मुखेड येथे सोयीच्या ठिकाणी घेऊन जातात. ग्रामीण रुग्णालयाकडे रुग्ण घेऊन जाण्याचा, दाखल करण्याचा कल अधिक आहे. अतिशय जोखीमेचा रुग्ण नांदेडला पाठविण्याचे प्रमाण शहरातून अधिक असल्याने ग्रामीण रुग्णालयाची मोठी दमछाक होत असल्याचे चित्र आहे. निधी तत्काळ उपलब्ध करुन देवून रुग्णांना दिलासा देण्याची मागणी होत आहे़