आईला बाजारात पाठवून मुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:15 IST2017-08-07T00:15:40+5:302017-08-07T00:15:40+5:30
आईला बांगड्या घेण्यासाठी पैसे देऊन बाहेर पाठविल्यानंतर एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली

आईला बाजारात पाठवून मुलाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आईला बांगड्या घेण्यासाठी पैसे देऊन बाहेर पाठविल्यानंतर एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी मुकुंदवाडी परिसरातील रेल्वेपटरीजवळ घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
अमोल पांडुरंग आणेराव (२६, रा. मुकुंदवाडी, रेल्वेपटरी परिसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, अमोल आणि त्याचे वडील हे मोबाईल कंपन्यांचे टॉवर उभे करण्याचे कामे करतात. सध्या त्यांचे काम नाशिक जिल्ह्यात सुरू आहे. सतत बाहेरगावी राहून कामे करणारा अमोल चार दिवसांपूर्वी घरी आला होता. शनिवारी दुपारी त्याने त्याच्या आईला बांगड्या भरण्यासाठी पैसे दिले आणि बांगड्या भरून येण्यास सांगितले.
आई दुकानावर गेल्यानंतर घरी कोणीही नसताना त्याने छताच्या आढ्याला वायर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर त्याची आई घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसला. मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अमोलचा मृतदेह घाटीत दाखल केला. बाहेरगावी असलेले अमोलचे वडील औरंगाबादेत आल्यानंतर रविवारी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.